मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखताना मनीष पांडेने नाबाद ९९ धावांची खेळी साकारून गतविजेत्या कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कर्नाटकने बलाढय़ मुंबईला चार विकेट राखून पराभवाचा धक्का देत विजय हजारे करंडक अखिल भारतीय एकदिवसीय स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकांत ८ बाद २८६ धावा केल्या. श्रेयस अय्यर (७७) आणि सूर्यकुमार यादव (६७) यांनी चौथ्या विकेटसाठी १३५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकने दोन चेंडू शिल्लक असताना हे आव्हान गाठले. मनीषने ११२ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ९९ धावा केल्या. कर्नाटकची उपांत्य फेरीत बंगालशी गाठ पडणार आहे.
 पांडेने स्टुअर्ट बिन्नी (५८)सोबत चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची तर करुण नायर (३२) सोबत पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली.
दरम्यान युवराज सिंग व गुरकिराट सिंग मान यांच्या अर्धशतकांच्या बळावर पंजाबने रेल्वेचा पाच विकेट राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत ८ बाद २८६ (श्रेयस अय्यर ७७, सूर्यकुमार यादव ६७; अभिमन्यू मिथुन २/५७) पराभूत वि. कर्नाटक : ४९.४ षटकांत ६ बाद २८७ (रॉबिन उथप्पा ४३, मनीष पांडे नाबाद ९९, स्टुअर्ट बिन्नी ५८; विल्किन मोटा २/३९).