Mumbai Indians Announces Replacement: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सलग पाच सामने जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. अचानक संघात मॅचविनर खेळाडूची एन्ट्री करण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ आज २० जानेवारीला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामना खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ वुमन्स प्रीमियर लीग २०२६ च्या गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अजून गट टप्प्यात संघाला ३ सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघाला उर्वरित ३ सामन्यांपैकी २ सामने तरी जिंकावा लागतील. यादरम्यान संंघाला मोठा धक्का बसला असून नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सने जी कमालिनीच्या जागी संघात कोणाची निवड केली?
डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माला महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या उर्वरित हंगामासाठी मुंबई इंडियन्स संघात निवडलं आहे. दुखापतीमुळे विकेटकीपर-फलंदाज जी कामलिनी हंगामातून बाहेर पडल्याने वैष्णवीची तिच्या जागी निवड करण्यात आली आहे.
WPL कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, नोव्हेंबरमधील मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेली २० वर्षीय वैष्णवी शर्माला मुंबई इंडियन्सने ३० लाखांच्या किंमतीसह संघात घेतलं आहे. तिने डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्या मालिकेत तिने ५ विकेट्स घेतल्या आणि यजमान भारताने ५-० असा क्लीन स्वीप केला होता.
निवेदनात पुढे सांगण्यात आलं आहे की, “टाटा महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या उर्वरित सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सने जी कामलिनीच्या जागी वैष्णवी शर्माची निवड केली आहे. चालू हंगामात जी कामलिनीने मुंबई इंडियन्ससाठी ५ सामने खेळले होते, मात्र दुखापतीमुळे तिला उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.”
भारताकडून पदार्पण करण्याआधी वैष्णवी शर्माने वरिष्ठ महिला टी-२० स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज म्हणून स्वतःची छाप पाडली होती. तिने ६.४७ च्या सरासरीने ११ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र या दमदार कामगिरीनंतरही लिलावात ती अनसोल्ड राहिली होती. १० लाख रुपये बेस प्राइस असतानाही वैष्णवी अनसोल्ड राहिली. या लिलावातील दुर्लक्षाबाबत वैष्णवीचे वडील डॉ. नरेंद्र शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं होतं की, कुटुंब यामुळे बिलकुल निराश झालं नाही. त्यांनी आपल्या मुलीला ही गोष्ट समजावून सांगितली आणि तिनेही ते सकारात्मकपणे स्वीकारलं.
“आम्ही कोणीही निराश नव्हतो. आम्ही तिला सांगितलं की ही फार मोठी गोष्ट नाही. एखादा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत असेल, तर त्याची भारताच्या संघात निवड नक्कीच होते आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. तिनेही आमचं म्हणणं मान्य केलं,” असं ते म्हणाले होते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून वैष्णवीची निवड होण्याआधी काही दिवस आधीच तिची भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० आणि वनडे या दोन्ही मालिकांसाठी निवड झाली आहे.
