Mumbai Indians New Support Staff IPL 2027: मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल पर्वासाठी संघात मोठे बदल केले आहेत. मुंबई इंडियन्सने गुरूवारी गोलंदाजी कोच लसिथ मलिंगा, फिल्डिंग कोच कार्ल हॉपकिन्सन व गोलंदाजी कोच पारस म्हांब्रे यांना पदावरून हटवल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता फ्रँचायझीने त्यांच्या जागी नव्या कोचिंग स्टाफमध्ये संधी मिळालेल्या प्रशिक्षकांची घोषणा केली आहे. पाहूया कोणाकोणाला संधी मिळाली आहे.
आगामी हंगामासाठी फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये चार नव्या नियुक्त्या केल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षकॉ, तर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघनची गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टी. दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची, तर मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीकडे डेव्हलपमेंट गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नव्या कोचिंग टीममध्ये मुख्य प्रशिक्षक कायरन पोलार्ड याचाही समावेश असेल. मुंबई इंडियन्सची संस्कृती आणि संघाची कार्यपद्धती याची जाण असलेले अनुभवी चेहरे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणि युवा खेळाडूंना घडवण्यावर भर देण्याचा फ्रँचायझीचा प्रयत्न आहे. आता या नव्या कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सचा संघ IPL २०२७ मध्ये कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोण कोण?
मुख्य प्रशिक्षक (Head Coach) – कायरन पोलार्ड
फलंदाजी प्रशिक्षक (Batting Coach) रॉबिन उथप्पा
गोलंदाजी प्रशिक्षक (Bowling Coach) – मिचेल मॅक्लेनघन
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) – टी दिलीप
डेव्हलपमेंट गोलंदाजी प्रशिक्षक (Developmental Bowling Coach) – धवल कुलकर्णी

१. रॉबिन उथप्पा (फलंदाजी प्रशिक्षक)
२००७ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचा रॉबिन उथप्पा भाग होता. २००८ मध्येही त्याने मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. आता पुन्हा एकदा तो मुंबईच्या ताफ्यात परतला आहे. भारतीय क्रिकेट आणि विविध फ्रँचायझी संघांसाठी खेळण्याचा त्याला मोठा अनुभव आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विभागाला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

२. मिचेल मॅक्लेनघन (गोलंदाजी प्रशिक्षक)
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. खेळाडू म्हणून त्याने या फ्रँचायझीसह मोठं यश मिळवलं आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत तो मुंबई इंडियन्सकडून खेळला. याच काळात २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशा चार आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाचा तो सदस्य होता. आक्रमक गोलंदाजी आणि मैदानावरील आक्रमक वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मॅक्लेनघनकडे आता मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. टी-२० क्रिकेटमधील त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

३. टी. दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक)
टी. दिलीप भारतीय पुरुष क्रिकेट संघाबरोबर यशस्वी काम केल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीममध्ये दाखल झाले आहेत. २०२४ आणि २०२६ च्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक गटात त्यांचा समावेश होता. याशिवाय २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघासोबतही त्यांनी काम केलं आहे. क्षेत्ररक्षण विभागातील कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलीप यांच्याकडे आता मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षणाला अधिक मजबूत करण्याची जबाबदारी असेल.

४. धवल कुलकर्णी (डेव्हलपमेंट गोलंदाजी प्रशिक्षक)
मुंबईच्या क्रिकेटमधील परिचित चेहरा असलेला माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीही मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. यावेळी त्याच्याकडे डेव्हलपमेंट गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धवल कुलकर्णी दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. २०१३ आणि २०२० मध्ये मुंबईने जेतेपद मिळवलं, त्या दोन्ही मोहिमांमध्ये तो संघाचा भाग होता. त्याने मुंबई इंडियन्सकडून दोन वेगवेगळ्या कालावधीत प्रतिनिधित्व केलं. पहिल्यांदा २००८ ते २०१३ आणि त्यानंतर २०२० ते २०२१ या काळात तो संघाकडून खेळला. आता प्रशिक्षकाच्या भूमिकेतून तो मुंबईच्या नव्या गोलंदाजांना घडवण्याचं काम करणार आहे.
