वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स येत्या सीझनमध्ये आपलं जेतेपद कायम ठेवण्याच्या इराद्याने उतरेल. येत्या ९ जानेवारी २०२६ पासून WPLचा आगामी सीझन सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स स्पर्धेत उतरणार आहे. तर पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंंजर्स बंगळुरू संघांमध्ये होणार आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्स नव्या फिरकी गोलंदाजी कोचची नियुक्ती केली आहे.
मुंबई इंडियन्सने २०२६ महिला प्रीमियर लीग (WPL) हंगामासाठी माजी ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर क्रिस्टन बीम्स यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा फ्रँचायझीने सोमवारी केली. पण क्रिस्टन बीम्स नेमकी कोण आहे, जाणून घेऊया.
बीम्सने ऑस्ट्रेलियासाठी १ कसोटी, ३० एकदिवसीय, १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून महिला बिग बॅश लीग (WBBL)मध्ये तिन ४५ टी-२० सामने खेळले आहेत. बीम्स आता मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षक लिसा केटली, मार्गदर्शक झुलन गोस्वामी, फलंदाजी प्रशिक्षक देविका पालशीकर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक निकोल बोल्टन यांच्यासोबत काम करणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक मोहिमांमध्ये बीम्सचा मोलाचा वाटा राहिला असून २०१७ च्या वनडे विश्वचषकात ती सर्वाधिक विकेट घेणारी तिसरी गोलंदाज ठरली होती. ४१ वर्षीय क्रिस्टन बीम्स हिला प्रशिक्षकपदाची मोठा अनुभव आहे. तिने WBBL आणि ‘द हंड्रेड’ स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. याशिवाय ती ऑस्ट्रेलिया महिला अंडर-१९ संघाची प्रशिक्षक, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल डेव्हलपमेंट लीड तसेच क्रिकेट तस्मानियामध्ये कम्युनिटी क्रिकेट मॅनेजर (दक्षिण विभाग) म्हणूनही कार्यरत राहिली आहे.
महिला प्रीमियर लीग (WPL)च्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी फ्रँचायझी ठरली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन हंगामांपैकी दोन वेळा त्यांनी जेतेपद पटकावलं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने दोन्ही वेळा अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद उंचावलं.
WPL 2026 ची सुरुवात ९ जानेवारीपासून होणार असून, पहिल्याच सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. २८ दिवस चालणारी ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा येथील दोन मैदानांवर खेळवली जाणार आहे.
