Mumbai Indians First Franchise to play 300 Matches: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ मधील आपल्या मोहिमेला आज २९ मार्चला सुरूवात करत आहे. पहिला सामना केकेआरविरूद्ध खेळवला जात आहे, जो संघाच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर खेळवला जात आहे. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत मुंबईचा संघ प्रथम गोलंदाजी करणार असल्याचं सांगितलं. यासह मुंबई इंडियन्सने मैदानात उतरताच अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
टी२० क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाने खेळलेल्या सर्वाधिक सामन्यांच्या बाबतीत, पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ ३०३ सामन्यांसह यादीत अव्वल स्थानी आहे. सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लबनेही ३०३ सामने खेळले आहेत. आता, आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने इतिहास घडवला आहे. केकेआरविरूद्धचा मुंबई इंडियन्सचा हा ३०० वा सामना आहे. यापूर्वी कोणताच आयपीएल संघ अशी कामगिरी करू शकलेला नाही.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सर्वाधिक ३०० सामने खेळणारी जगभरातील पहिली फ्रँचायझी ठरली आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या १८ हंगामांमध्ये एकूण २७७ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत २२ सामने खेळले आहेत. एकूणच, संघाने या फॉरमॅटमध्ये २९९ सामने खेळले होते. आता यंदाच्या हंगामातील पहिला सामना हा संघाचा ३०० वा सामना आहे. तर मुंबई इंडियन्स कोणत्याही स्तरावर ३०० टी-२० सामने खेळणारा जगातील तिसरा संघ ठरला आहे.
जगातील सर्वाधिक टी२० सामने खेळलेले संघ
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ: ३०३ सामने
सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब: ३०३ सामने
मुंबई इंडियन्स: ३०० सामने*
हॅम्पशायर काउंटी क्रिकेट क्लब: २९६ सामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: २८७ सामने
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससोबत संयुक्तपणे सर्वाधिक, म्हणजेच पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत. या बाबतीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहेच, पण त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीतही ती पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई आपला ३०० वा सामना खेळणार आहे. यानंतर, २८७ टी-२० सामने खेळून आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर, एकूण २८१ टी-२० सामने खेळून केकेआर तिसऱ्या स्थानावर आहे.
