Allah Ghazanfar On India vs Afghanistan Series: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद करुन मालिका खिशात घातली. कसोटी मालिकेनंतर आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेत अफगाणिस्तानकडून मुंबई इंडियन्सचा १९ वर्षीय स्टार फिरकी गोलंदाज अल्लाह गजनफर देखील खेळताना दिसून येणार आहे. अल्लाह गजनफरने मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना रोहित शर्मासारख्या अनुभवी गोलंदाजाला नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. या अनुभवाचा फायदा भारताविरुद्ध खेळताना होऊ शकतो, असं अल्लाह गजनफर म्हणाला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १३ जूनला धरमशालेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अल्लाह गजनफर म्हणाला, “रोहित एक दिग्गज आणि उत्तम फलंदाज आहे. तो डावाची सुरुवात करण्यासाठी येतो आणि मी नवीन चेंडून गोलंदाजी करतो. त्याच्याकडून मला जे काही शिकायला मिळालं आहे, त्याचा आम्ही नक्कीच फायदा घ्यायचा प्रयत्न करु. मग बघूया काय होतं.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आयपीएल स्पर्धेदरम्यान जेव्हा मी फलंदाजी करत होतो, त्यावेळी त्याने मला काही सल्ले दिले होते. मी त्याचा आभारी आहे.” अल्लाह गजनफरला आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी मिळाली. यादरम्यानत जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारख्या खेळाडूंकडून त्याला खूप काही शिकायला मिळालं. याबाबत बोलताना अल्लाह गजनफर म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळताना चांगले प्रशिक्षक मिळतात आणि अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. त्यांच्यासोबत सामने खेळणं आणि ड्रेसिंग रुम शेअर करणं हे खूप काही शिकवणारं होतं.”
भारताविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तानने कसून तयारी केली आहे. या मालिकेत अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काही खेळाडूंना भारतात आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलबाबत बोलताना अल्लाह गजनफर म्हणाला, “आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी चांगली राहिली. इथे खूप जास्त उष्णता आहे. आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. इथे येण्याआधी आमच्या संघाने काबूलमध्ये एक महिना सराव केला आहे. आम्ही खेळपट्टी आणि हवामानानुसार स्वतःला जुळवून घेतले असून खेळाडूंचा उत्साह दांडगा आहे.”
