Mumbai Indians Release Players List: आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक संघ म्हणून ओळखला जाणारा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. पण हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना मुंबईला ३ पैकी एकही हंगामात ट्रॉफी उंचावता आलेली नाही. या हंगामातही मुंबईचा संघ तळाशी राहिला. त्यामुळे आगामी हंगामात मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान मुंबईचा संघ कोणत्या खेळाडूंना रिलीज करु शकतो? जाणून घ्या.

हार्दिक पंड्या

आयपीएल २०२७ स्पर्धेत रिलीज होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिक पंड्या हे नाव सर्वात आघाडीवर आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल २०२६ स्पर्धेतील मध्यातच हार्दिकने कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासह त्याना मानसिक तणावामुळे मुंबई इंडियन्स सोडण्याचीही इच्छा केल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिक पंड्या गेल्या हंगामात कर्णधार म्हणून फ्लॉप ठरत असला तरीदेखील तो अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वौत्तम खेळांडूपैकी एक आहे. त्यामुळे मुंबईने त्याला रिलीज केलं, तर आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

शार्दुल ठाकूर

आयपीएल २०२६ स्पर्धेच्या लिलावाआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये ट्रेड झाला होता. मुंबईने अर्जुन तेंडुलकरला लखनौमध्ये जाऊ दिलं आणि शार्दुल ठाकूरला आपल्या संघात स्थान दिलं. पण मुंबईचा हा डाव फसला. त्याने या स्पर्धेतील ९ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १२ गडी बाद केले. त्याला या हंगामात फार षटकं टाकण्याची संधी दिली गेली नव्हती. तसेच फलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याची ही कामगिरी पाहता, त्याला आगामी हंगामात रिलीज केलं जाऊ शकतं.

दीपक चहर

चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चहर जेव्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला, त्यावेळी वाटलं होतं की वेगवान गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होणार. कारण स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणाऱ्या दीपक चहरला वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा चांगलाच फायदा होणार होता. पण दीपक चहर आपल्या अनुभवाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. या हंगामात गोलंदाजी करताना त्याला केवळ ८ गडी बाद करता आले. त्याआधी झालेल्या हंगामात त्याला केवळ ११ गडी बाद करता आले होते. या हंगामात गोलंदाजी करताना त्याने २६.३ षटकात २६५ धावा खर्च केल्या. त्याची ही फ्लॉप कामगिरी पाहता, मुंबईचा संघ आगामी हंगामात त्याला रिलीज करण्याचा निर्यण घेऊ शकतो.