आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू झाली, तेव्हा एकच नाव तुफान चर्चेत होतं ते म्हणजे मुंबई इंडियन्स. कारण वर्ल्डकप विजेते खेळाडू, अनुभवी खेळाडू आणि गोलंदाजीत – फलंदाजीत समतोल असलेला असा हा संघ. पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या घरच्या मैदानावर पराभूत करून मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. पण त्यानंतर लागोपाठ पराभवांचा सामना करावा लागला. आता हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सकडे अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्सचा संघ हा असा संघ आहे, ज्या संघाने फायनलमध्ये १२० धावांचा यशस्वी बचाव केला आहे. पण आता हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला होता. पण मुंबईचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करू शकले नाहीत. आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ६ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. ५ वेळचा चॅम्पियन संघ यावेळी गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे.
मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो का?
आयपीएल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्व संघांचे प्रत्येकी ७-७ सामने खेळून झाले आहेत. सर्व संघांना १४-१४ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यामुळे १६ गुण असलेला संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत ८ सामने पूर्ण झाले आहेत. यादरम्यान केवळ २ सामने जिंकले आहेत. अजूनही ६ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईचा संघ पुढील ६ सामने जिंकून १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. जर मुंबईचा संघ १६ गुणांपर्यंत पोहोचला आणि इतर संघांचेही १६ गुण असतील तर नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये जाणारा संघ ठरेल.
असं झाल्यास मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल…
मुंबईकडे प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. कारण एक जरी सामना गमावला तर, मुंबईचं प्लेऑफ गाठणं कठीण आहे. असं झाल्यास मुंबईला इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. पण जर २ सामने गमावले, तर मग प्लेऑफमधून पूर्णपणे बाहेर. मुंबई इंडियन्सचा संघ काही कठोर निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
