मुंबई इंडियन्सला गट टप्प्यातील अखेरच्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून ११ धावांनी पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सचा पराभव करत गुजरात संघाने प्लेऑफमध्ये धडक मारली. या हंगामात गतविजेत्या मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. प्लेऑफसाठी सध्या एकच जागा शिल्लक असताना यासाठी अजूनही तीन दावेदार आहेत, दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरियर्ज व मुंबई इंडियन्स. मुंबईचे गट टप्प्यातील सामने संपले असले तरी आता अखेरच्या सामन्याच्या निकालासह टीम इंडिया पुढील फेरी गाठली आहे.

मुंबईने WPL २०२६ मध्ये त्यांचे सर्व गट टप्प्यातील सामने संपले आहेत. लीग टप्प्यात, त्यांना आठ पैकी फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. यासह संघ गुणतालिकेत सहा गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पण मुंबईला अजूनही सहा गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा आता दिल्ली-युपीच्या सामन्यावर अवलंबून आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईसमोर काय समीकरण आहे, ते पाहूया.

मुंबई इंडियन्सचे लक्ष आता १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्ज सामन्यावर असेल. मुंबई इंडियन्सचे खेळाडू प्रार्थना करतील की युपीचा संघ या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करेल. यामुळे तिन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण होतील. सध्या दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे समान गुण आहेत, तर युपी वॉरियर्ज ४ गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. जर दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध पराभव पत्करला तर दिल्ली, मुंबई आणि यूपी या तिन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण होतील.

युपी वॉरियर्जने जर दिल्लीविरूद्धचा सामना १५०+ धावांनी जिंकला किंवा १८+ षटकं राखून सामना जिंकला तर संघ प्लेऑफ गाठू शकतो, अन्यथा दिल्लीचा पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफ गाठेल. दिल्लीने जर युपीचा पराभव केला तर दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये धडक मारतील. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट +०.०५९ आहे, तर दिल्लीचा नेट रन रेट -०.१६४ आहे आणि उत्तर प्रदेशचा नेट रन रेट -१.१४६ आहे. त्यांच्या नेट रन रेटच्या आधारे, मुंबई एलिमिनेटरमध्ये पोहोचू शकते.

स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सने आधीच WPL 2026 च्या प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. आठ पैकी सहा सामने जिंकून RCB ने थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. गुजरात जायंट्स एलिमिनेटरमध्ये आहेत आणि ते कोणत्या संघाशी सामना करतील हे गट टप्प्यातील अखेरचा सामना निश्चित करेल.