Mumbai Indians Coach on Rohit Sharma: आयपीएलच्या १९व्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना २८ मार्च रोजी होणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला मुंबई इंडियन्स, आपला पहिला सामना २९ मार्चला त्यांच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळेल. मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेपूर्वी तयारी सुरू केली असून संघाचा महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मादेखील संघात सामील झाला आहे. पण रोहितला यंदाही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवणार का, असा प्रश्न चाहत्यांनी पडला आहे.
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामाची तयारी सुरू केली असून, संघातील बहुतेक खेळाडू आता संघात सामील झाले आहेत. या हंगामात रोहित शर्मा मुख्य आकर्षण असेल आणि सर्वजण त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या संदर्भात मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्याकडूनही एक मोठं विधान आले असून, त्यांनी स्पष्ट केलं आहे की रोहित आयपीएल २०२६ मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही.
रोहित शर्माबाबत मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणाले?
एमआय ज्युनियर २०२६ च्या अंतिम सामन्यादरम्यान रोहित शर्माबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महेला जयवर्धने यांनी सांगितलं, “गेल्या वर्षी आम्ही त्याला ज्या पद्धतीने मॅनेज केलं, त्यावेळी त्याला काही किरकोळ दुखापतींचाही त्रास होता, त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक होतं. मात्र तो मैदानावर असो किंवा नसो, संघावर त्याचा मोठा प्रभाव असतो. पण यावर्षी शक्य तितकं त्याला अधिक वेळ मैदानावर ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल,” असे जयवर्धने म्हणाले.
“पण जेव्हा आम्ही गोलंदाजांची किंवा इम्पॅक्ट प्लेअरची अदलाबदल करतो, तेव्हा कधी कधी दुसरा खेळाडू मैदानावर असणं गरजेचं ठरतं. आमच्या संघात बहुतेक खेळाडू ऑलराउंडर आहेत आणि गोलंदाजीही करतात. त्यामुळे कर्णधाराला मैदानावर तो पर्याय हवा असेल, तर प्रतिस्पर्धी संघानुसार त्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागतो. रोहित आणि सूर्या हे दोनच खेळाडू ऑलराउंडर नाहीत. त्यामुळे त्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, यावर आम्ही चर्चा करू आणि पुढे कसं होतं ते पाहू,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या आठवड्यात त्याने खूप मेहनत घेतली आहे. आमच्या ट्रेनिंग कॅम्पच्या पहिल्याच दिवशी तो संघात सहभागी झाला. नेट्समध्ये तो खूपच चांगला दिसला, खरंच प्रभावी होता. रोहितचा एक नवा अवतार पाहायला मिळतोय. अधिक फिट दिसतोय. त्यामुळे तो सुरूवातीपासूनच संघाचं नेतृत्व करताना पाहण्याची मला उत्सुकता आहे,” असे जयवर्धने यांनी पुढे सांगितलं.
