Jatin Paranjape On Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या तुफान चर्चेत आहे. आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार, ३५ चेंडूत शतक झळकावल्यानंतर वैभवने कमी वयातच अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वैभवने जसप्रीत बुमराहच्या पाहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यासह बुमराहच्या एकाच षटकात २ षटकार खेचले. त्यामुळे त्याचं जोरदार कौतुक केलं जात आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू जतिन परांजपे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यावरून वैभव भविष्यात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

जतिन परांजपे यांची पोस्ट व्हायरल

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्याआधी जतिन परांजपे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून वैभवबाबत एक पोस्ट केली होती. जी सध्या तुफान चर्चेत आहे. त्यांनी लिहिले, “वैभव सूर्यवंशी आज आपल्या भविष्यातील संघाविरुद्ध खेळणार…”, ही पोस्ट व्हायरल होताच, वैभव खरंच मुंबई इंडियन्सकडून खेळणार का? अशी चर्चा रंगली आहे.

मुंबई इंडियन्स संघ हा स्टार खेळाडूंना संघात घेत नाही, हा संघ युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान देतो आणि त्यांना स्टार बनवतो. तिलक वर्मा , हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलसारखे खेळाडू याचं उदाहरण आहेत. वैभव अवघ्या १५ वर्षांचा आहे. तो जर ४० वर्षांपर्यंत क्रिकेट खेळणार असेल तर, अजूनही २५ वर्ष तो क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे मुंबईचा संघ भविष्यातील गुंतवणूक म्हणून त्याला आपल्या संघात स्थान देऊ शकतो.

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. २०२५ मध्ये त्याला राजस्थानकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. पहिल्याच हंगामात त्याने ३५ चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट आणि अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता.