बडोदा : गतविजेता मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी गुजरात जायंट्सविरुद्ध खेळेल, तेव्हा दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य असेल. या सामन्यात चमकदार कामगिरी करत दोन्ही संघ ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील.

गुजरातचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे आणि त्यांची निव्वळ धावगती -०.२७१ अशी आहे. गुजरातचा संघ मुंबई (सहा गुण, निव्वळ धावगती ०.१४६) आणि दिल्ली कॅपिटल्स (सहा गुण, निव्वळ धावगती-०.१६४) यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. त्यामुळे गुजरातचा संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. मात्र, गुजरातसाठी चिंताजनक बाब म्हणजे, त्यांनी मुंबईिवरुद्ध याआधीचे आठही सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचे पारडे जड मानले जाईल.

गेल्या लढतीत गुजरातने दिल्ली कॅपिटल्सवर, तर मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर विजय मिळवला होता. दिल्लीविरुद्ध मुंबईकडून नॅट स्किव्हर-ब्रंटने लीगमधील पहिल्या शतकाची नोंद केली. हेली मॅथ्यूजने गोलंदाजीत तीन बळी मिळवले होते. आता कामगिरीत सातत्य राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, जिओ हॉटस्टार ॲप.