MI Fan Proposed KKR Fan: क्रिकेटचा उत्सव म्हणून ओळखला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर एकतर्फी विजयाची नोंद केली. तर स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने दमदार विजय मिळवला. या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्स संघाचं होम ग्राऊंड आहे. मुंबईचा संघ जेव्हा जेव्हा आपल्या होम ग्राऊंडवर खेळतो तेव्हा, मुंबईचे चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी तुफान गर्दी करतात. या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या ॲक्शनसह रोमँटिक सीन देखील पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांसह कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चाहत्यांनी देखील आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावली होती. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या फॅनने स्टँड्समध्येच सामना पाहत असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फॅनला प्रपोज केलं. पण प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसणार, इतक्यात एक ट्विस्ट आला.

अंगठी हातातून निसटली. त्यावेळी इतरांनी त्याला अंगठी शोधण्यात मदत केली. अंगठी सापडल्यानंतर त्याने ती अंगठी तिच्या बोटात घालून तिला प्रपोज केलं. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. कोलकाताकडून अजिंक्य रहाणेने ६७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २२० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने ७८, तर रायन रिकल्टने ८१ धावांची खेळी करून मुंबईला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.