scorecardresearch

MI Franchise: मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीमध्ये आणखी एका संघाची एंट्री; ‘या’ लीगमध्ये मैदान गाजवण्यास सज्ज

Mumbai Indians New York Team:आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आणखी एका नव्या संघाचा प्रवेश झाला आहे. एमआय फ्रँचायझीने मेजर क्रिकेट लीगमध्ये नवीन संघ खरेदी केला आहे.

MI Franchise MI New York team
मुंबई इंडियन्स (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

MI Franchise New Team: झटपट क्रिकेटचा थरार आता जगात सर्वत्र पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेत SA20 आणि अबू धाबीमध्ये आंतरराष्ट्रीय लीग टी-२० नंतर आता अमेरिकेत झटपट क्रिकेटची रोमांचक स्पर्धा सुरू होणार आहे. या लीगमध्ये सर्वात यशस्वी आयपीएल संघ मुंबई इंडियन्सची मालकी असलेल्या फ्रँचायझीने एमआय न्यूयॉर्क संघ विकत घेतला आहे. मेजर क्रिकेट लीगमध्ये मुंबई इंडियन्सपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझींनीही संघ खरेदी केले आहेत.

या लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या पाच संघांचा सहभाग –

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघ पाच वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये सहभागी आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावाव्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स महिला प्रीमियर लीगमध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या एसए20 लीगमध्ये एमआय केपटाऊन, या वर्षी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये एमआय एमिरेट्समध्ये नावाने सहभागी आहे. आता याशिवाय एमआय न्यूयॉर्क नावाचा संघ मेजर लीग क्रिकेटमध्ये उतरणार आहे.

संघ पहिल्या MLC मध्ये खेळेल –

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर संघ पहिल्या एमएलसीमध्ये खेळणार आहे. यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचे मालक जीएमआर ग्रुप आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी सिएटल ऑर्कास संघात गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज टेक्सास संघाचा भाग आहे.

हेही वाचा – WPL 2023: गुजरात जायंट्समधून वगळल्यानंतर डिआंड्रा डॉटिनने सोडले मौन, संघ व्यवस्थापनावर केले गंभीर आरोप

मुंबई इंडियन्सची नवी सुरुवात –

मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी म्हणाल्या, “न्यूयॉर्क संघाचे मुंबई इंडियन्स कुटुंबात स्वागत करताना खूप आनंद होत आहे. अमेरिकेतील पहिल्या क्रिकेट लीगमध्ये सहभागी होऊन आम्ही मुंबई इंडियन्सला जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित करू शकू. मुंबई इंडियन्ससाठी ही एक नवीन सुरुवात आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे.”

पाच वेळा विजेतेपदावर कब्जा केला –

मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वोत्तम संघ आहे. आयपीएलमध्ये संघाने २०१३ मध्ये पहिल्यांदा विजेतेपदावर कब्जा केला होता. यानंतर त्यांनी २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले आहे. ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स सज्ज आहेत. संघाचे सर्व खेळाडू सराव सत्रात घाम गाळत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 19:05 IST

संबंधित बातम्या