Will Hardik and Surya play must-win game against RCB: मुंबई इंडियन्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना खेळणार आहे. मुंबईचा संघ प्लेऑफमधून लवकर बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे संघाला उर्वरित चारही सामने जिंकायचे आहेत, त्यापैकी पहिला सामना आरसीबीविरूद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव हे दोन्ही महत्त्वाचे खेळाडू खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती, यावर आता मुंबईने मोठी अपडेट दिली आहे.
१० मे रोजी रायपूरमध्ये होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. सुरुवातीला हे दोन्ही खेळाडू संघासोबत प्रवास करताना दिसले नव्हते. पाठदुखीच्या त्रासामुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या मागील सामन्याला मुकलेला हार्दिक पंड्या संघासोबत नव्हता. तर दुसरीकडे, हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादव पत्नीसमवेत नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या स्वागतासाठी मुंबईतच थांबला होता.
यानंतर हार्दिक पंड्या ७ मे रोजी रायपूरमध्ये संघात पुन्हा दाखल झाला आहे. “हार्दिकची वैद्यकीय पथकाकडून सातत्याने तपासणी केली जात आहे. त्याच्या प्रकृतीबाबत लवकरच पुढील अपडेट दिले जातील,” अशी माहिती मुंबई इंडियन्सने आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिली. “सूर्या उद्या संघात सहभागी होईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर?
आरसीबीविरुद्धचा सामना मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ असा आहे. संघाचे दोन्ही प्रमुख खेळाडू अनुपस्थित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नेतृत्वाची धुरा सांभाळेल का, याबाबत चर्चा रंगली होती. सध्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावरून तळाशी आहे. मात्र, सूर्यकुमार यादव सामना सुरू होण्यापूर्वी संघात दाखल होणार असल्याने, हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही तर सूर्यकुमारच नेतृत्व करेल, अशी शक्यता आहे.
सध्या मुंबई इंडियन्स ६ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता अजून जिवंत असली तरी त्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकणं संघासाठी अनिवार्य आहे. मुंबई इंडियन्ससाठी परिस्थिती अत्यंत कठीण झाली असून, प्लेऑफच्या आशा कायम ठेवण्यासाठी त्यांना उरलेले सर्व सामने जिंकण्यासोबतच इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावं लागणार आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी १६ गुणांचा आकडा पार करणं महत्त्वाचा असतो, पण सर्व चारही सामने जिंकल्यानंतर मुंबईचा संघ फक्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतो, यामुळे संघाला नेट रन रेट आणि इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.
