वेंकट कृष्णा बी

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे मातब्बर खेळाडू आहेत पण तरीही यंदाच्या हंगामात मुंबईची गाडी पूर्णत: रुळावरून घसरली आहे. प्लेऑफ्ससाठी पात्र ठरायच्या त्यांच्या आशा मावळल्या आहेत. गुणतालिकेत ते तळाशी जात आहेत. मुंबईचं नेमकं काय चुकतंय?

मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या हंगामात सतत भेडसावणारा प्रश्न फॉर्म हा नाहीये. ते ज्या पद्धतीने खेळत आहेत, ती पद्धत हा आहे. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या- यांच्यापैकी तिघं टी२० वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग होते. क्विंटन डी कॉक आणि रायन रिकलटन हे दोघेही धडाकेबाज सलामीवीर आहेत. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पंड्या हा लाईनअप प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा आहे. मात्र शनिवारी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हवेत उडी मारून मारलेला फटका डीप पॉंइंटला डेवाल्ड ब्रेव्हिसच्या हातात जाऊन विसावला. तिलक वर्माच्या शतकाने काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सला सूर गवसला असं आश्वासक चित्र निर्माण केलं होतं. नूर अहमदच्या फिरकीविरुद्ध खेळताना त्याने मारलेला फटका हवेत उडाला. हार्दिक २३ चेंडू टिकला. अनेकदा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन भरकटला. अनेकदा हिट आणि मिस झालं. अखेर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. तीन मोठे खेळाडू मात्र त्यांचं योगदान समाधानकारक वर्गात मोडणारं नव्हतं.

फलंदाजांचा वैयक्तिक फॉर्म ही अडचण नाहीये. खरी अडचण संरचनेत आहे. ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सचा ढाचा आहे त्यातच गडबड आहे. कसं ते समजून घेऊया.

गेल्या तीन आयपीएल हंगामांमध्ये टी२० प्रकारातल्या बॅटिंगमध्ये मूलभूत बदल झाला आहे. तुफान फटकेबाजी करणाऱ्या युवा फलंदाजांची एक फौजच तयार झाली आहे. त्यांना आपण टी२० बेबीज असं नाव देऊया. ही युवा मंडळी बेडरपणे धुवांधार फटकेबाजी करतात. पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये ते बॉलर्सला चोपून काढतात. चेंडूच्या ठिकऱ्या उडवतात आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचतात. इतक्या वेगाने धावा कुटतात की प्रतिस्पर्ध्यांना काही कळायच्या आत शंभरी बोर्डवर लागलेली असते. अभिषेक शर्मा, प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी या तिघांचंच उदाहरण घ्या. अभिषेक पंजाबसाठी जे करतो तेच वैभव राजस्थानसाठी. पंजाबसाठी हेच काम प्रियांश करतो. या कामात त्याला प्रभसिमनरची पुरेपूर साथ मिळते. राजस्थान, पंजाब संघांनी हा ट्रेंड सगळ्यात आधी ओळखला.

राजस्थानने लिलावाआधी याची तयारी केली आणि शाळकरी वयाच्या वैभवला ताफ्यात समाविष्ट केलं. वैभव १५व्या वर्षी जगातल्या अव्वल गोलंदाजांचा समाचार घेतो आहे. पंजाबनेही दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या प्रियांश आर्यला हेरलं आणि संघात सामील केलं. लिलावात या दोघांना घेण्यासाठी संबंधित संघांनी तयारी केली होती. ती तयारी कामी येते आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये सर्वाधिक स्ट्राईकरेट असणारे संघच टॉप४ मध्ये आहेत हा निव्वळ योगायोग नाही. पॉवरप्ले हा आता नुसता डावाचा भाग एवढ्यापुरता मर्यादित विषय नाही. आयपीएल हंगाम जिंकण्यासाठी अत्यंत निर्णायक असा हा अर्धातासाचा निर्णायक टप्पा झाला आहे.

मुंबईला अशा स्वरुपाचं प्रारुप सापडलेलं नाही. दानिश मालेवार आणि रॉबिन मिन्झ गुणी प्रतिभाशाली युवा क्रिकेटपटू आहेत पण तूर्तास तरी ते प्रियांश किंवा वैभवसदृश फटकेबाजी करत नाहीयेत.

अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाच्या टॅलेंट स्काऊटचं कौतुक केलं जात असे. देशभरात सुरू असणाऱ्या टी२० सामन्यांना उपस्थित राहून, गुणवंतांना हेरून त्यांना ट्रायलसाठी बोलावणं, त्यांच्याशी समन्वय साधणं, लिलावात बोली लावून त्यांना ताफ्यात समाविष्ट करणं यात मुंबई इंडियन्स वाकबगार होतं. अनेक सुपरस्टार त्यांनी घडवले. मग हार्दिक पंड्या असो किंवा जसप्रीत बुमराह. आता ही बिरुदावली बाकी संघांकडे संक्रमित झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाला डॅडीज आर्मी म्हटलं जात असे. संघात तिशी नव्हे तर पस्तिशीपल्याड खेळाडूंचाच भरणा असे. टी२० हा तरुणांचा वेगवान असा प्रकार आहे हे चेन्नईच्या लक्षात आलं. त्यानुसार त्यांच्या डावपेचांमध्ये पॅराडाईम शिफ्ट झाला. युवा खेळाडूंवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. लिलावात युवा खेळाडूंना घेण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर या नवख्या मुलांसाठी चेन्नईने जवळपास एवढी प्रचंड रक्कम खर्च केली. हे दोघं लगेच मॅचविनर ठरणार नाहीत पण चेन्नईने त्यांच्यावर काम करणं सुरू केलं. नेमकं काय करायला हवं हे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला कळलं असं मिनी ऑक्शनमध्ये वाटलं. पण ते पुरेसं नव्हतं. एखादा बदल करून मोठं चित्र बदलणार नाही. त्यासाठी मूलभूत विचारच बदलावा लागणार आहे.

त्यांनी लाडका हिटमॅन रोहित शर्मावरच लक्ष केंद्रित केलं. रोहित आता चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्या नेतृत्वातच भारताने टी२० वर्ल्डकप जिंकला. रोहितच्यात नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने ५ जेतेपदं नावावर केली. मात्र रोहित आता टेस्ट आणि टी२० प्रकारात खेळत नाही. तो फक्त वनडे खेळतो. वनडे सामन्यांची संख्या अल्प अशी आहे. तो कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. टी२० प्रकारातल्या या नव्या बदलाशी जुळवून घेणं असं त्याला सांगणंही कठीण आहे. कारण नवीन मुलांची पाटी कोरी आहे. त्यांच्या नावाला वलय नाही. गोलंदाज कोण याची फिकीर ते करत नाहीत. त्यांचा स्वतचा ब्रँड अजून तयार व्हायचा आहे. षटकार मारताना बाद होऊ याची जराही काळजी ते करत नाहीत. १९वा हंगाम खेळणाऱ्या रोहित शर्माला असं खेळ सांगणं सोपं नाही. विल जॅक्स, रायल रिकटलन आणि क्विंटन डी कॉक हे तिघेही दर्जेदार खेळाडू आहेत, यात शंकाच नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नावाला पत आहे. पण ही पत यंदाच्या आयपीएल हंगामात तुम्हाला पॉवरप्लेचं गणित सोडवून देत नाहीये. ज्या संघांनी पॉवरप्लेचं गणित लक्षात घेतलं आहे ते फलंदाज समोरच्या संघासमोर वेगळ्याच अडचणी निर्माण करतात. अनुभव, तंत्र या त्या गोष्टी नाहीत. धावा करण्याची भूक आणि बिनधास्त फटकेबाजीचा दृष्टिकोन. या मंडळींना आधी काय झालंय याने काहीही फरक पडत नाही. ते पॉवरप्लेचा प्रत्येक चेंडू बाऊंड्रीपल्याड जाईल यासाठी प्रयत्न करतात.

काहीजण म्हणतील की मुंबई इंडियन्सची गोलंदाजीही यंदा यथातथाच आहे. वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर मुंबई इंडियन्स संघाने दोनशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि तरीही ते हरले आहेत. पण हा मुद्दा दुय्यम आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोनशेपल्याड धावसंख्येचा सहजी पाठलाग करत आहेत कारण त्यांचे टॉप ऑर्डर फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुफान आक्रमण करतात. ते समोरच्याला संधीच देत नाहीत. धावगतीचं दडपण वगैरे गोष्टी त्यांना त्रास देत नाहीत कारण ते षटकामागे १५-२० धावा चोपून काढतात. पॉवरप्लेमध्ये शंभर धावा झाल्यानंतर समोरच्या संघाला मागे ढकलणं शक्य होत नाही.

मुंबईचा संघ पाटा खेळपट्टीवर २०० धावा करू शकतो. शनिवारीही त्यांनी तेच केलं. पण ते पुरेसं ठरलं नाही. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना २०० ही धावसंख्या मेन कोर्स म्हणजे मुख्य जेवण नाही ते स्टार्टर ठरतं. मुंबईच्या संघात मोठमोठी नावं आहेत. स्टारडम असलेले खेळाडू आहेत. भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलेले खेळाडू आहेत. पण सध्याचा त्यांचा संघ टी२० प्रकारातल्या युवा बेधडक मनोवृत्तीला साजेसा नाही हे खरं.