Rohit Sharma Viral Video: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत ७ सामने झाले असून केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मुंबईचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध आपल्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत हिट आहे. पण त्याला आपल्या फिटनेसमुळे ट्रोल केलं जायचं. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आणि फिट झाला. आयपीएल २०२६ स्पर्धेत त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. सुरूवातीला त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला होता. पण त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला काही सामने खेळता आलेले नाही.

दुखापतीमुळे बाहेर झालेला रोहित शर्मा सध्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत असून कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. फिटनेस आपल्या मैदानावरील कामगिरीसह रोहित आपल्या मजेशीर स्वभावासाठीही ओळखला जातो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो शार्दुल ठाकूरसोबच जिममध्ये मस्ती करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शार्दुल ठाकूर जिममध्ये ट्रेनिंग करत आहे. त्यावेळी रोहित शर्मा त्याची फिरकी घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ रोहितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर “लॉर्डसोबत हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करतोय… ” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत रणवीर सिंगने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत या व्हिडीओवर अडीच मिलियन्सहून अधिक लाईक्स आले आहेत. रोहितची मजेशीर कृती पाहून शार्दुल ठाकूरलाही हसू आवरलं नाही.