Hardik Pandya Captaincy Big Issue for Mumbai Indians: आयपीएलचं विक्रमी पाच वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबईने १३ वर्षांनंतर स्पर्धेतील पहिला सामना जिंकत मोहिमेला दणक्यात सुरूवात केली. पण यानंतर सलग तीन सामने मुंबईने गमावले आहेत. मुंबईकडे उत्कृष्ट गोलंदाजी आक्रमण असूनही ते प्रत्येक सामन्यात फेल ठरत आहेत. मुंबईची एकूणच स्पर्धेतील कामगिरी बघून संघावर टीका केली जात आहे. पण माजी खेळाडूने कर्णधार हार्दिक पंड्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताच्या माजी खेळाडूने कोणतेही आढेवेढे न घेता थेट मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला आरसीबीविरूद्ध संघाच्या पराभवाला जबाबदार ठरवलं. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी व फलंदाजी म्हणजेच एकूण सांघिक कामगिरी खराब असल्याने संघाची कामगिरी खालावली आहे, असं चित्र आहे. पण या माजी क्रिकेटपटूंनी थेट हार्दिक पंड्याला संघाच्या कामगिरीसाठी जबाबदार ठरलं.

भारताचे माजी खेळाडू सदागोप्पन रमेश यांनी मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर आरसीबीविरूद्ध २२ धावांनी झालेल्या पराभवानंतर हार्दिक पंड्याच्या रणनितीवर टीका केली. रमेश यांनी म्हटलं की सध्या पाच वेळा विजेते ठरलेल्या संघाची सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांचा कर्णधार आणि त्याचं नेतृत्त्व आहे. सलग तीन पराभवांनंतर ही बाब अधिक ठळकपणे समोर आली आहे.

“मुंबई इंडियन्सची एकमेव समस्या म्हणजे हार्दिक पंड्याचं नेतृत्व. खेळाडू म्हणून हार्दिक सर्वोच्च स्तरावर आहे, पण कर्णधार म्हणून तो अजूनही सामान्य वाटतो. पॉवरप्लेमध्ये बुमराहची दोन षटकं वापरणं ही मोठी चूक होती. हो, इतर गोलंदाजांची धुलाई होत होती, त्यामुळे हार्दिक दबावाखाली होता. पण बुमराहने आपलं दुसरं षटक डावाच्या सहाव्या षटकात टाकलं आणि त्यानंतर तो थेट १७व्या षटकात परत आला. म्हणजेच तुमचा सर्वोत्तम गोलंदाज तब्बल ६० चेंडू खेळात नव्हताच,” असं रमेश म्हणाले.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर आरसीबीने मुंबईत ४ बाद २४० धावांचा मोठा डोंगर उभारला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धचा त्यांचा हा सर्वोच्च स्कोअर ठरला. सदागोप्पन रमेश यांनी हार्दिक पंड्याच्या फिरकी गोलंदाजांच्या वापरावरही जोरदार टीका केली. मिचेल सॅन्टनरने आपल्या पहिल्याच षटकात २४ धावा दिल्या, तर मयंक मार्कंडेयने दोन षटकांत ४० धावा दिल्या.

आरसीबीविरूद्ध सामन्याचा पराभवाचं खापर हार्दिक पंड्यावर फोडलं

“हार्दिकने केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे सातव्या आणि आठव्या षटकात दोन्ही टोकांहून फिरकी गोलंदाजांचा वापर. वानखेडेसारख्या मैदानावर दोन्ही टोकांहून फिरकी टाकणं ही मोठी चूक आहे. त्याने मार्कंडेयला रजत पाटीदारसारख्या फलंदाजाविरुद्ध षटक दिलं, जो आधीच उत्कृष्ट खेळाडू आहे आणि फिरकीविरुद्ध तर अधिक धोकादायक ठरतो. अशा फलंदाजाविरुद्ध फिरकी गोलंदाजी कशी टाकणार?” अशी टीका रमेश यांनी केली.

“कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या काहीसा गोंधळलेल्या अवस्थेत दिसतो. त्याने टीम डेविडला एक उंच फुलटॉस टाकला आणि त्यावर रिव्ह्यू घेतला. अगदी सूर्यकुमार यादवसुद्धा त्याने रिव्ह्यू घेतल्यावर आश्चर्यचकित झाला होता. त्यानंतर हार्दिकने तो निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तसेच, रोहित शर्मा हार्दिकच्या अनेक निर्णयांशी सहमत नसल्याचंही स्पष्ट दिसतं,” असं रमेश यांनी सांगितले.

“जरी मुंबई इंडियन्स संघ हा सामना जिंकला असता, तरी कर्णधार म्हणून झालेल्या चुका इतक्या ठळक आहेत की त्या सुधारल्याशिवाय संघाला अव्वल चारमध्ये स्थान मिळवणं आणि विजेतेपद जिंकणं कठीण होईल. या संघात जेवढी क्षमता आहे, ते पाहता हार्दिकने कर्णधार म्हणून काहीतरी विशेष करण्याची गरज नाही, फक्त मोठ्या चुका टाळणं आवश्यक आहे. इतक्या मजबूत संघासह मुंबई इंडियन्स अव्वल चारमध्ये पोहोचली नाही, तर ते खरोखरच आश्चर्यकारक ठरेल,” असे त्यांनी पुढे म्हटलं. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता १६ एप्रिलला पंजाब किंग्सविरूद्ध घरच्या मैदानावर होणार आहे.