MI vs KKR IPL 2026: आयपीएल २०२६ मधील दुसरा सामना चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील सलामीचा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. मुंबई संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली सर्वप्रथम ५ आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. पण मुंबई संघाच्या माथी गेली अनेक वर्षे एक कलंक कायम आहे. मुंबईचा संघ आतातरी हा कलंक पुसणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

मुंबई इंडियन्सची पहिली मॅच देवाला हे आपण सातत्याने बरेच वर्षे ऐकत आलो आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतील सलामीचा सामना गेल्या १३ वर्षांपासून जिंकलेली नाही. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात यंदा तरी मुंबई इंडियन्स स्पर्धेतील पहिला सामना जिंकणार का, यावर चाहत्यांच्या नजरा असतील.

मुंबई इंडियन्सचा ‘पहिला सामना देवाला’ सत्र थांबणार का?

मुंबईने गेल्या १३ वर्षांपासून स्पर्धेतील आपला सलामीचा सामना जिंकलेला नाही. मुंबई इंडियन्सने २०१२ मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजयाने सुरूवात केली होती. पण त्यानंतर संघाने प्रत्येक स्पर्धेत आपला सलामीचा सामना गमावला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई यावेळी हा खराब विक्रम पुसून टाकण्याचा प्रयत्न करेल. आयपीएल २०२६ साठी मुंबईचा संघ कागदावर खूपच मजबूत दिसत आहे. पण काही खेळाडू मात्र संघात अद्याप दाखल झालेले नसल्याचे रिपोर्ट्सही समोर आले आहेत.

संघात रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन यांच्या रूपाने तीन दमदार सलामीचे फलंदाज आहेत. मुंबईची मधली फळीसुद्धा बऱ्यापैकी संतुलित दिसते. संघात तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांच्यासारखे मजबूत फलंदाज आहेत. संघाने लिलावापूर्वी शेरफन रदरफोर्डला ट्रेड करत ताफ्यात सामील केलं, जो एकहाती आपल्या फटकेबाजीने सामन्याचं चित्र पालटू शकतो. तर संघात अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्याशिवाय कार्बिन बॉश, शार्दुल ठाकूर आणि विल जॅक्स हे पर्याय आहेत. विल जॅक्सने टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत ४ सामनावीर पुरस्कार पटकावले होते.

गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह संघाच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करेल. बुमराहला दीपक चहर आणि ट्रेंट बोल्ट यांची साथ मिळेल. फिरकी गोलंदाजी विभागात संघाकडे अल्लाह गझनफर आणि मिचेल सँटनरसारखे दोन चांगले फिरकी गोलंदाज आहेत. याव्यतिरिक्त, संघाकडे मयंक मार्कंडेचा पर्यायही उपलब्ध आहे.