IPL 2026 Mumbai Indians on Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२६ मध्ये आजचा म्हणजेच ७ एप्रिलचा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा तरूण खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्याभोवती सध्या चर्चेचं मोठं वलय निर्माण झालं आहे. मुंबई इंडियन्सचा संघ लयीत असलेल्या वैभवला रोखण्यासाठी काय रणनिती आखणार, मुंबई काय वेगळं करणार, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, मुंबई इंडियन्सने याकडे फारसं लक्ष न देता आपला पवित्रा शांत ठेवला आहे.
वैभवने हंगामाची दमदार सुरुवात केली असली, तरी मुंबई आपला नैसर्गिक खेळ करण्यावरच ठाम आहे. वैभव सूर्यवंशीने सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये कमाल कामगिरी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यापूर्वी बोलताना मुंबई इंडियन्सचे गोलंदीज कोच पारस म्हांब्रे यांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं.
गुवाहाटीतील सामन्यापूर्वी बोलताना मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रे यांनी स्पष्ट केलं की, वैभव हा त्यांच्यासाठी अजिबात अनोळखी नाही. म्हांम्ब्रे म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे वैभव काही नवीन खेळाडू नाही. हे त्याचं दुसरं वर्ष आहे, त्यामुळे या स्तरावर तो सर्वांना परिचित आहे.” यावेळी त्यांनी वैभवच्या कामगिरीचं कौतुकही केलं. त्याची फलंदाजी प्रशंसा करण्यासारखी असून तो आपल्या संघाला अपेक्षित असलेली भूमिका चोख पार पाडत असल्याचं म्हाम्ब्रे यांनी नमूद केलं.
वैभव सूर्यवंशीसाठी मुंबई इंडियन्सच्या सामन्यासाठीच्या तयारीत कोणताही बदल होणार नाही असं कोचने सांगितलं. म्हांब्रे म्हणाले, “आम्हाला माहित आहे की तो एक चांगला खेळाडू आहे, पण आमची तयारी इतर खेळाडूंसाठी जशी असते, तशीच त्याच्यासाठीही असेल.” कोणत्याही ‘हायप’च्या आहारी न जाता मुंबईचा ‘थिंक-टँक’ आपल्या मूळ रणनीतीवरच ठाम राहण्यावर भर देत आहे.
मुंबईचे बॉलिंग कोच रवी बिश्नोईबाबत काय म्हणाले?
राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू रवी बिश्नोई सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण म्हांम्ब्रे यांनी त्याला ‘मिस्ट्री’ मानण्यास स्पष्ट नकार दिला. “रवी आता माझ्यासाठी कोणताही मिस्ट्री स्पिनर राहिलेला नाही. तो गेल्या अनेक वर्षांपासून खेळत असल्याने तो काय करू शकतो, हे सर्वांनी पाहिलं आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला अशा टप्प्यातून जावं लागतं. कधी एखादा सामना चांगला जातो, तर कधी नाही,” असही म्हांब्रे त्याच्या मागील हंगामातील फॉर्मबद्दल म्हणाले. रवी बिश्नोई राजस्थानकडून खेळताना गतवर्षी फारशी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता.
मुंबई इंडियन्ससाठी बिश्नोई हा “इतर गोलंदाजांसारखाच” असेल आणि त्याच्याविरुद्धची रणनीती पूर्वग्रहातून न ठरवता सामन्यातील परिस्थितीनुसार आखली जाईल, अशी माहिती अखेरीस म्हांब्रे यांनी दिली.
