Deepak Chahar Viral Video: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या दीपक चाहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो, ३ बॅट चोरीला गेल्याची माहिती देताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, ज्याने या बॅट चोरी केल्या आहेत, त्यांना या बॅटची किंमत किती आहे हे माहीत नसावं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

क्रिकेटपटू म्हटलं तर बॅट हा जिव्हाळ्याचा विषय असतो. बॅट तुटणं किंवा चोरीला जाणं हे वेदना देणारं असतं. दरम्यान दीपक चाहर ज्या मैदानावर सराव करत होता. त्या मैदानावरून त्याचे ३ बॅट चोरीला गेल्या आहेत. या बॅट कोणी चोरल्या हे अद्यापही कळू शकलेलं नाही. त्यामुळे दीपक चाहरने चोरीला गेलेल्या बॅट पुन्हा आणून द्या, हवं तर पैसे घ्या, अशी विनंती करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपक चाहर म्हणाला, “काल संध्याकाळी माझ्या बेअर एडिशनच्या ३ बॅट मैदानातून चोरीला गेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, मी आता काय करायला हवं? चोरी झालेल्या बॅट खूपच चांगल्या होत्या. त्या तिन्ही बॅटची किंमत जवळपास दीड लाख इतकी आहे. ज्याने चोरी केल्या आहेत, त्यालाही माहीत नसेल की त्या बॅट किती महागड्या आहेत. तो जाईल आणि त्या बॅट विकून टाकेल किंवा मग टेनिस बॉलने खेळणार. माझ्याकडे आता अनेक पर्याय आहेत. पोलिसांत जाऊन तक्रार करू, योगीजींकडे जाऊ किंवा मग पंतप्रधान मोदींकडे जाऊन तक्रार करू. नाहीतर मग, बॅट मिळू दे म्हणून देवाकडेच प्रार्थना करेन.”

ज्याने कोणी बॅट चोरल्या आहेत त्याने बॅट परत आणून द्यावी, मी त्यांना पैसे देईन, असेही तो म्हणाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्या स्वींग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा दीपक चाहर गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून आला होता. पण या हंगामात तो आपली छाप सोडू शकला नव्हता. डिसेंबर २०२२ मध्ये तो भारतासाठी शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करू शकलेला नाही.