Mumbai Indians Release Lasith Malinga Coaching Staff: आयपीएल २०२७ मध्ये मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये देखील मोठे बदल होणार आहेत. मुंबई इंडियन्सने आगामी सीझनपूर्वी महेला जयवर्धनेला प्रशिक्षकपदावरून हटवलं होतं. त्यानंतर कायरन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. आता गोलंदाजी कोच लसिथ मलिंगासह अजून २ प्रशिक्षकांनाही मुंबई इंडियन्सने रामराम ठोकला आहे.
गेल्या काही हंगामांत मुंबईच्या संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघाच्या व्यवस्थापनात बदल करण्यात येत आहेत. कायरन पोलार्डची नियुक्ती केल्यानंतर आता संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी काही बदल झाले आहेत. दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची मुंबई इंडियन्ससोबतची वाटचाल संपली आहे. याशिवाय, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि फिल्डिंग प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांनीही फ्रँचायझीची साथ सोडली आहे.
लसिथ मलिंगाने खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. निवृत्तीनंतर तो कोचिंग स्टाफचा भाग बनला आणि त्याने विविध भूमिका बजावल्या. मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं, तसेच २०११ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा जिंकली. या यशात मलिंगाची खेळाडू म्हणून महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्याने मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणूनही मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केलं. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये मलिंगाची गणना केली जाते. त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत.
मलिंगासह २ कोचने सोडली मुंबईची साथ
लसिथ मलिंगा आणि पारस म्हाम्ब्रे यांच्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमधून कार्ल हॉपकिन्सन बाहेर पडले. २०२५ च्या हंगामापूर्वी ते मुंबई इंडियन्सच्या कोचिंग सेटअपमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडे संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. मात्र, आता मुंबई इंडियन्सने त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स आपल्या कोचिंग स्टाफमध्ये आणखी कोणत्या नव्या सदस्यांची नियुक्ती करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. लसिथ मलिंगा, पारस म्हाम्ब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांच्या बाहेर पडण्यामुळे संघाच्या कोचिंग सेटअपमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.
लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे, कार्ल हॉपकिन्सन या तिन्ही प्रशिक्षकांच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाणार, याबाबत मुंबई इंडियन्सने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीसाठी संघ व्यवस्थापन आपल्या सपोर्ट स्टाफची टीम कशी निश्चित करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
