Mumbai Indians Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. पण गेल्या काही हंगामात या संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. यावेळी या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मुंबई इंडियन्स संघाची मजबूत प्लेईंग ११ निवडली आहे. या संघात त्याने वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिलेलं नाही. दरम्यान कोणत्या ११ खेळाडूंना स्थान दिलं आहे? जाणून घ्या.
शार्दुल ठाकूरला ठेवलं संघाबाहेर..
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना इरफान पठाणने मुंबई इंडियन्स संघाची प्लेईंग ११ निवडली आहे. त्याने रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. तर स्फोटक फलंदाज तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं. तर संघातील ३६० फलंदाज सूर्यकुमार यादवला त्याने चौथ्या क्रमांकावर ठेवलं. हे चौघेही संघातील प्रमुख फलंदाज आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने कर्णधार हार्दिक पंड्याची निवड केली आहे. सहाव्या क्रमांकाची जबाबदारी त्याने विल जॅक्स किंवा मग रुदरफोर्डकडे सोपवली आहे.
इरफान पठाणने फिनिशर म्हणून नमन धीरची निवड केली आहे. नमन धीर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. यासह वेगवान गोलंदाज म्हणून, त्याने दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांना संधी दिली आहे.
यासह फिरकी गोलंदाज म्हणून त्याने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज अल्लाह गजनफरला स्थान दिलं आहे. यासह इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याने फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेची निवड केली आहे. मुंबईचा संघ या स्पर्धेतील सर्वात संतुलित आणि मजबूत संघांपैकी एक आहे. कारण या संघात भारताला चॅम्पियन बनवून देणारे खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव भारतीय टी – २० संघाचा कर्णधार आहे. तर जसप्रीत बुमराहने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आता मुंबईचा संघ कशी कामगिरी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
