Mumbai Indians IPL 2026 Playing 11 Predictions: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २८ मार्चपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी सराव करायला देखील सुरूवात केली आहे. मुंबई इंडियन्सने देखील या स्पर्धेसाठी कसून सराव करायला सुरूवात केली आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मुंबईचा संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे आहे. तर मुंबईला ५ वेळा चॅम्पियन बनवून देणारा कर्णधार रोहित शर्मा आणि भारताला टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याच संघाचा भाग आहे. मुंबईचा पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल मुंबई इंडियन्सची मजबूत प्लेईंग ११? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मासारखे आक्रमक फलंदाज आहेत. जे भारतीय संघात फलंदाजी करतानाही टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतात. हे तिघेही फलंदाज मुंबई इंडियन्सला स्फोटक सुरूवात करून देऊ शकतात. तर दक्षिण आफ्रिकेचे स्फोटक खेळाडू क्विंटन डी कॉक किंवा रायन रिकल्टन यापैकी एका खेळाडूला यष्टीरक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. रोहित नेहमीप्रमाणे डावाची सुरूवात करताना दिसेल. यावेळीही त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला जाऊ शकतो. तर रायन रिकल्टन किंवा क्विंटन डीकॉक पैकी एक यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. यासह विल जॅक्स फलंदाजीसह गोलंदाजीतही मोलाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो.

भारताचा टी-२० वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादव नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. सूर्यकुमार यादवने गेल्या हंगामात फलंदाजी करताना ७०० हून अधिक धावा केल्या होत्या. तर तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसून येऊ शकतो. कर्णधार हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.

मुंबई इंडियन्सने २०२५ मध्ये झालेल्या लिलावात नमन धीरला आरटीएम कार्डचा वापर करून आपल्या संघात घेतलं होतं. गेल्या काही हंगामांमध्ये त्याने संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे नमन धीरला देखील संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेत बॉशने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच अनुभवी गोलंदाज दिपक चाहरला देखील प्लेईंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट नव्या चेंडूने गोलंदाजी करताना दिसू शकतो. तर संघातील अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल.