Mumbai Indians Playing 11 For MI vs RCB Match: मुंबई इंडियन्सला सलग पराभवांचा धक्का बसल्याने आता प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. मुंबईने यापुढील एकही सामना गमावल्यास ते स्पर्धेतून बाहेर होतील. मुंबईचा पुढचा सामना १० मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या दुखापतीमुळे हा सामना मुकण्याची शक्यता असून तो संघासोबत रायपूरला पोहोचलेला नाही. तर सूर्यकुमार यादव वैयक्तिक कारणांमुळे पुढच्या सामन्यात खेळताना न दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबईची प्लेईंग इलेव्हन कशी असणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मुंबई इंडियन्सने रायन रिकल्टन व रोहित शर्माच्या फटकेबाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. या शर्यतीत टिकून राहण्याकरता मुंबईला पुढील चारही सामने कोणत्याही स्थितीत जिंकायचे आहेत. अशा महत्त्वाच्या क्षणी संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर होण्याची शक्यता आहे.
हार्दिकची दुखापत हे मुंबई इंडियन्स व्यवस्थापनापुढील एकमेव आव्हान नाही. तर, सूर्यकुमार यादव देखील वैयक्तिक कारणांमुळे पुढील सामना मुकण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्या लवकरच बाबा होणार आहे. हार्दिक आणि सूर्यकुमार दोघेही संघातील वरिष्ठ खेळाडू आहेत, पण जर ते दोघेही खेळले नाहीत तर मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन प्लेईंग इलेव्हन कशी तयार करेल? जाणून घेऊया.
हार्दिक-सूर्याशिवाय मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन कशी असणार?
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी ही आहे की रोहित शर्मा फिट होऊन संघात परतला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात १४३ धावांची सलामीची भागीदारी केल्यानंतर, रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन डावाची सुरुवात करतील. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादवने केलं होतं, पण आता हे दोघेही खेळाडू संघात नसल्यास रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद येणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. रोहितशिवाय तिलक वर्मा हा देखील नेतृत्त्व करण्यासाठी पर्याय असू शकतो.
पंजाबविरुद्ध ११२ धावा करत शतक झळकावणारा क्विंटन डी कॉक अनेक सामन्यांसाठी संघाबाहेर आहे. जर डी कॉकने डावाची सुरुवात केली, तर फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त चार विदेशी खेळाडूंना संधी देऊ शकत असल्याने, यष्टीरक्षक-फलंदाज रॉबिन मिन्झ किंवा शार्दुल ठाकूर यांना मुख्य संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सची आरसीबीविरूद्ध सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, एम गझनफर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा, दीपक चहर</p>
