IPL 2026: MI playoff chances: मुंबई इंडियन्सच्या पराभवांचा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. १६ एप्रिलला मुंबईच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्सच्या मुंबई इंडियन्सवरील ७ विकेट्स आणि २१ चेंडू राखून मिळवलेल्या विजयानंतर संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईने सलग चौथा सामना गमावल्याने संघ आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की पाच वेळा विजेते ठरलेले मुंबई इंडियन्स ९व्या स्थानावर असताना प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतील का?

पंजाब किंग्सने १९६ धावांचे लक्ष्य २१ चेंडू शिल्लक ठेवत आणि ७ विकेट्स राखून सहज गाठलं. या विजयामागे प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांची १३९ धावांची जबरदस्त भागीदारी महत्त्वाची ठरली. प्रभसिमरन ८० धावांवर नाबाद परतला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने सलग तिसरं अर्धशतक झळकावत ६६ धावा केल्या. याआधी अल्लाह गझनफरने प्रियांश आर्य आणि कूपर कॉनॉली यांना लवकर बाद करत दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण त्याला मुंबईच्या इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अर्शदीप सिंगने सलग दोन चेंडूंवर रायन रिकेल्टन आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केलं. त्यानंतर नमन धीर आणि क्विंटन डी कॉक यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. दोघांनीही अर्धशतकं पूर्ण केली, मात्र धीर ५१ धावांवर बाद झाला. यानंतर डी कॉकने आयपीएलमधील आपलं तिसरं शतक झळकावलं.

तरीही शेवटच्या षटकांमध्ये पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत मुंबईला १९५ धावांपर्यंतच रोखलं. अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. रोहित शर्मा हा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. हार्दिक पांड्यानेही तो पुढील काही सामने चुकवणार असल्याची पुष्टी केली आहे.

मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी कशी पात्र ठरू शकते?

मुंबई इंडियन्सने ५ सामन्यांत फक्त एक विजय (केकेआरविरुद्ध) मिळवत सध्या २ गुण मिळवले आहेत. मागील काही हंगामांत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी १६ गुण हा साधारण मापदंड राहिला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांतून मुंबईला अजून १४ गुण मिळवणं आवश्यक आहे. मुंबई इंडियन्सला अद्याप स्पर्धेत ९ सामने खेळायचे आहेत. याचा अर्थ असा की उर्वरित सामन्यांपैकी त्यांना सात सामने जिंकावे लागतील, तेव्हाच ते गट टप्पा पार करू शकतील. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सने नेहमीच कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२५ मध्येही त्यांनी अशाच खराब सुरूवातीनंतर पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.