Mumbai Indians Qualification Scenario after MI vs SRH Match: मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादकडून ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सचा हा यंदाच्या स्पर्धेतील सहावा पराभव आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमधील स्थान धोक्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात पार निराशा केली. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ २४४ धावांचं लक्ष्य सहज पार केलं. या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफ गाठण्याची संधी आहे का जाणून घेऊया.

वानखेडेवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी संघात मोठे बदल केले होते. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे आणि क्विंटन डीकॉकच्या दुखापतीमुळे सलामी जोडी बदलली. विल जॅक्स व रायन रिकल्टनची जोडी मुंबईकडून फलंदाजीला उतरली. या दोघांनीही मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर रायन रिकल्टनच्या नाबाद १२३ धावांच्या बळावर मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ५२ चेंडूत १२९ धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर हेनरिक क्लासेनने ६० धावा तर सलील अरोराने १० चेंडूत ३० धावांची खेळी करत १८.३ षटकांत संघाला सहज विजय मिळवून दिला.

सध्या मुंबई इंडियन्सच्या खात्यात ८ सामन्यांत ४ गुण आहेत. यासह मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. शिवाय मुंबईचा नेट रन रेट ऋणमध्ये गेला असून -०.७८४ असा झाला आहे. आता मुंबई इंडियन्सला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर त्यांना उर्वरित सामन्यांपैकी सर्व सामने जिंकावे लागतील. जे संघाचा एकंदरीत फॉर्म पाहता अवघड दिसत आहे.

हेही वाचा

मुंबई इंडियन्सला प्लेऑफ गाठण्यासाठी किती सामने जिंकावे लागणार?

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सला उर्वरित ६ सामन्यांपैकी किमान ६ सामने जिंकावे लागतील, तेव्हाच त्यांची प्लेऑफची आशा कायम राहू शकते. आयपीएलमध्ये २०२२ पासून १० संघांचा फॉरमॅट सुरू झाल्यानंतर, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः १६ गुणांचा टप्पा ‘मॅजिक नंबर’ मानला जातो. २०२२ मध्ये आरसीबी आणि २०२३ आणि २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स या संघांनी १६ गुणांसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यामुळे सामान्यतः पुढील फेरीत जाण्यासाठी किमान १६ गुण आवश्यक मानले जातात.

फक्त २०२४ मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं, जेव्हा चार संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे सर्व १४ गुणांवर होते. त्यावेळी नेट रनरेट चांगला असल्यामुळे RCBने चौथ्या स्थानावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मुंबई इंडियन्सकडे ७ सामन्यांनंतर ४ गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना किमान १६ गुण गाठावे लागतील, म्हणजेच उर्वरित सामन्यांमध्ये सातत्याने विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे.

मुंबई इंडियन्सला १४ गुण मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

१४ गुणांपर्यंत पोहोचण्यासाठीही मुंबई इंडियन्सला उर्वरित ६ सामन्यांपैकी किमान ५ तरी सामने जिंकावे लागतील. पण सध्याची संघाची कामगिरी पाहता हे नक्कीच खूप कठीण आहे. या गुणांसहित मुंबईला नेट रन रेटवर देखील विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. दोन संघांचे समान गुण झाल्यास जर नेट रन रेट कमी असेल तर मुंबई मागे राहू शकते.