Mumbai Indians Review Meeting: आयपीएल २०२६ स्पर्धेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ १-१ विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला. माध्यमातील वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आयपीएल हंगामात तो दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो. हार्दिक पंड्या मुंबईची साथ सोडून जाणार, हे जवळजवळ निश्चित झालं आहे. पण मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आणखी एक दिग्गज मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुढच्या आठवड्यात मुंबई इंडियन्सची आढावा बैठक पार पडणार आहे. ही बैठक इंग्लंडमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२६ स्पर्धेतील कामगिरीबाबत आणि भविष्याबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सर्वात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे, हार्दिक पंड्याचा ट्रेड होणार की नाही? या विषयावर देखील चर्चा केली जाणार आहे. यासह मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेला देखील डच्चू दिला जाऊ शकतो.
श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने हा २०१७ पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईचा संघ गेल्या ६ हंगामात आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. त्याच्या या फ्लॉप कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सची टीम मॅनेजमेंट त्याच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत महेला जयवर्धने या संघाचा भाग राहणार की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धा झाल्यानंतरच, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. एकूण ७ संघांना हार्दिक पंड्या आपल्या संघात हवा आहे, अशी चर्चा देखील रंगली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग राहणार, की संघाची साथ सोडून जाणार हे स्पष्ट होणार आहे. हार्दिक पंड्या संघाची साथ सोडून गेल्यानंतर, मुंबईचा कर्णधार कोण होणार? अशी देखील चर्चा रंगली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तिलक वर्मा किंवा जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार होऊ शकतो.
