Hardik Pandya Mumbai Indians Rift: आयपीएल २०२६ मधून मुंबई इंडियन्सचा संघ बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सला आरसीबीविरूद्ध सामन्यात पराभवाचा धक्का बसला आणि त्यामुळे संघ स्पर्धेबाहेर झाला. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीमुळे गेले काही सामने खेळलेला नाही. पण या दुखापतीदरम्यान तो संघाच्या डगआऊटमध्येही दिसून आला नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान आता हार्दिक पंड्याच्या गर्लफ्रेंडने टाकलेल्या इन्स्टा स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्स यांच्या बिनसलं असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर पुन्हा नव्याने उधाण आलं आहे. हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. या पोस्टनंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की, १४ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्ध धर्मशालामध्ये होणाऱ्या आयपीएल २०२६ सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत गेला नाही.

माहिका शर्माच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी दावा केला की हार्दिक सध्या घरी आराम करत आहे आणि संघासोबत धर्मशाला येथे पोहोचलेला नाही. माहिकाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये हार्दिक पंड्या घरात उभा असून त्याच्या हातात मोठा फुलांचा गुच्छ दिसत असल्याचं चाहत्यांनी लक्षात आणून दिलं. माहिकाने शेअर केलेल्या या फोटमध्ये हार्दिकचा चेहरा दिसत नसला तरी तो फुलांचा गुच्छ घेतलेला व्यक्ती हार्दिकच असल्याचा दावा केला आहे.

हार्दिक पंड्या-मुंबई इंडियन्सने खरंच बिनसलं?

सध्या मुंबई इंडियन्सचा संघ धरमशालासाठी निघाला असताना हार्दिक पंड्या त्याच्या घरी आराम करत असल्याच्या चर्चा वेगाने पसरू लागल्या आहेत. बीसीसीआयने खेळाडूंना गर्लफ्रेंडसोबत प्रवास करण्यावर निर्बंध घातल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद असल्याच्या अफवाही सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Hardik Pandya GF Mahieka Sharma Instagram Story
हार्दिक पंड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी

सोशल मीडियावर अनेक पोस्ट्समध्ये हार्दिक पंड्या पंजाब किंग्जविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचे दावे केले जात आहेत. काही पोस्ट्समध्ये तर मुंबई इंडियन्सने हार्दिकला कर्णधारपदावरून हटवलं असून दुखापतीचं कारण केवळ त्याची प्रतिमा वाचवण्यासाठी पुढे केलं जात असल्याचंही म्हटलं जात आहे. याआधीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या रायपूरमधील सामन्यासाठी हार्दिक पंड्या सुरुवातीला संघासोबत गेला नव्हता. मात्र, नंतर तो त्याच्या गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत रायपूरला पोहोचला होता. त्यामुळे यावेळीही तो नंतर धरमशालामध्ये संघात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या हार्दिक पंड्याच्या उपलब्धतेबाबत किंवा तो संघासोबत नसल्याबाबत मुंबई इंडियन्स किंवा स्वतः हार्दिककडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्जविरुद्धचा सामना १४ मे रोजी धरमशालामध्ये होणार असून, हार्दिक उद्या किंवा थेट सामन्याच्या दिवशीही संघात सामील होऊ शकतो.