मुंबई इंडियन्ससंबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या हंगामातील संघाच्या खराब कामगिरीनंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता होती. संघाचे कोच व कॅप्टन बदलू शकतात असं चित्र होतं. पण आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
महेला जयवर्धने आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्सच्या (MI) मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची शक्यता आहे. फ्रँचायझीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची सध्या इच्छा नसल्याचं समजत आहे. जयवर्धने २०२४ मध्ये पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघासह “२+१” वर्षांच्या करारावर जोडला गेला होता. सध्याच्या कराराच्या चक्रातील पुढील वर्ष हे अखेरचं वर्ष असल्याने त्याला आणखी एक वर्षाची संधी दिली जाऊ शकते. येत्या काही दिवसात काही बदल झाला नाही, तर याबाबतची अधिकृत घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.
जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने २०२५ मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश केला, मात्र त्यानंतरच्या हंगामात संघाला नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. २०२६चा हंगाम मुंबईसाठी निराशाजनक ठरला. दुखापती, खेळाडूंच्या उपलब्धतेचे प्रश्न आणि ड्रेसिंग रूममधील अस्वस्थ वातावरणामुळे संघाची मोहीम अडचणीत आली आणि मुंबईला संपूर्ण हंगामात केवळ चार विजय मिळवता आले.
मागील हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या संभाव्य ट्रेडबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक फ्रँचायझींनी हार्दिकमध्ये रस दाखवला असला तरी, या मुद्यावर अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता नाईट रायडर्स संघासह हार्दिकच्या ट्रेडबाबत काही चर्चा झाली आहे. मात्र, ट्रेडसाठी आवश्यक असलेला खेळाडू किंवा अन्य गोष्टी उपलब्ध नसल्याने मुंबई इंडियन्स सध्या या प्रस्तावासाठी फारशी उत्सुक नाही. कॅमेरून ग्रीनचं नाव चर्चेत आलं होतं, पण पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त कसोटी कार्यक्रमामुळे त्याच्यावर असलेल्या कामाचा ताण पाहता MIच्या थिंक टँकला त्याच्याबाबत काहीशी चिंता आहे.
हार्दिक पंड्याचा ट्रेड न झाल्यास आश्चर्य वाटू नये. या मुद्द्यावर खेळाडूसोबतही चर्चा झाली आहे. ट्रेड पूर्ण होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात, त्यामुळे हा निर्णय तितका सोपा नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
हार्दिक पंड्याच्या बाबतीत MI काय निर्णय घेणार?
मुंबई इंडियन्स आगामी हंगामासाठी हार्दिक पंड्याला खेळाडू म्हणून संघात कायम ठेवण्याच्या विचारात आहे. मात्र, फ्रँचायझी आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली नव्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. व्यवस्थापनाने याबाबत आधीच चर्चा सुरू केली असून, भारत आणि MIचा माजी कर्णधार रोहित शर्मा कर्णधारपद आणि संघाच्या भविष्यातील वाटचालीबाबतच्या चर्चेत सक्रियपणे सहभागी असल्याचं समजतं.
रोहितला पुन्हा कर्णधार बनवण्याचा पर्यायही MIकडे होता. मात्र, ३९ वर्षीय रोहितला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याने आता नव्या चेहऱ्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे कर्णधारपदासाठी संभाव्य पर्याय मानले जात आहेत. सध्या तिलक वर्माच्या नावाला अधिक पसंती मिळत असल्याचं समजतं.
या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या एका सूत्राने सांगितलं, “हार्दिकचा ट्रेड झालाच नाही, तरी आश्चर्य वाटू नये. याच दिशेने खेळाडूसोबतही चर्चा झाली आहे. ट्रेड पूर्ण होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. त्यामुळे हा निर्णय तितका सोपा नाही.”
हार्दिक पंड्याचा ट्रेड न झाल्यास ड्रेसिंग रूममधील अस्वस्थ वातावरण कसं हाताळलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कर्णधारपदात बदल केल्याने परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी फ्रँचायझीला अपेक्षा आहे. मात्र, सध्याची अस्थिरता दूर करण्यासाठी व्यवस्थापनाला मोठे प्रयत्न करावे लागतील.
