मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स समोरासमोर

एकीकडे थरारक विजय मिळवलेला आणि दुसरीकडे गुणतालिकेत अव्वल असूनही सध्या फलंदाजीच्या दुष्टचक्रात अडकलेला असे दोन संघ ‘क्वालिफायर-२’मध्ये दाखल झाले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत ही फेरी गाठली आहे, तर दुसरीकडे रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून पराभव स्वीकारलेला मुंबई इंडियन्सच्या संघाने या लढतीत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या सामन्यात अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी निकराची झुंज होणार असून आतापर्यंतच्या पराभवाची सव्याज परतफेड कोलकाताचा संघ करणार की कोलकाताविरुद्धची आपली विजयी घाोडदौड मुंबईचा संघ कायम राखणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

आतापर्यंतच्या स्पर्धेतील साखळी सामन्यांच्या निकालाचा विचार केला तर कोलकातापेक्षा मुंबईचा संघ नक्कीच वरचढ राहिला आहे. गेल्या महिन्यात वानखेडेवर मुंबईने कोलकातावर मात करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली होती. या विजयानंतर मुंबईची विजयी एक्स्प्रेस सुसाट निघाली आणि गुणतालिकेत अव्वल स्थानही त्यांनी पटकावले. पण रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध त्यांना ‘एलिमिनेटर’मध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्यांना आता कोलकात्याशी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी लढत द्यावी लागणार आहे.

मुंबईची गोलंदाजी फलंदाजीपेक्षा नेहमीच वरचढ राहिलेली आहे. मिचेल मॅक्क्लिनॅघन, जसप्रीत बुमराह यांनी सातत्यपूर्ण भेदक मारा केला आहे. पण लसिथ मलिंगापेक्षा मिचेल जॉन्सन अधिक प्रभावी दिसला आहे. कर्ण शर्मा आणि हरभजन सिंग यांच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळालेले नाही. मुंबईची फलंदाजी कधीही कोसळू शकते. पार्थिव पटेल आणि लेंडल सिमोन्स यांनी काही सामन्यांमध्ये चांगली सलामी दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा फॉर्मात नसून ही संघासाठी चिंतेची बाब आहे. हार्दिक आणि कृणाल हे पंडय़ा बंधू अष्टपैलू असले तरी त्यांच्यामध्ये एकहाती सामना जिंकवून देण्याची कुवत नाही. किरॉन पोलार्डला आतापर्यंत २-३ सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली आहे. या सामन्यात अंबाती रायुडूला खेळवायचे की नितीश राणाला, हा मोठा प्रश्न मुंबईच्या संघापुढे असेल.

कोलकाताच्या संघाचा विचार केला तर त्यांनी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अचूक मारा केला होता. संघाने ठरवलेली रणनीती उमेश यादव, नॅथन कल्टर-नील, ट्रेंट बोल्ट, पीयूष चावला, सुनील नरिन यांनी अमलात आणली होती. कोलकात्याच्या गोलंदाजांनी आतापर्यंत सातत्यपूर्ण अचूक मारा केला आहे. फलंदाजीमध्ये नरिनने अनपेक्षितपणे धडाकेबाज सलामी करत साऱ्यांनाच धक्का दिला आहे. त्याच्यासारखी वादळी फलंदाजी आतापर्यंत कोलकात्याच्या फलंदाजांनाही बऱ्याचदा जमलेली नाही. गेल्या सामन्यात कर्णधार गंभीरची खेळी निर्णायक ठरली होती. या खेळीमुळे मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याचे मनोबल उंचावलेले असेल. ख्रिस लिनसारखा गुणवान खेळाडू संघात परतला आहे. रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण यांच्याकडून उपयुक्त खेळी पाहायला मिळाल्या आहेत.

दोन्ही संघांचा विचार केला तर सध्याच्या घडीला मुंबईपेक्षा कोलकात्याचे पारडे जड आहे. कारण ते गेल्या सामन्यातील विजयासह या लढतीत उतरणार आहेत. दुसरीकडे गुणतालिकेतील अग्रस्थान पटकावूनही मुंबईला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण कोलकाता संघाला धक्का देण्याची कुवत मुंबईच्या संघात नक्कीच आहे आणि त्यांनी ते या हंगामातील दोन्ही साखळी सामने जिंकून सिद्धही केले आहे. त्यामुळे हा सामना चांगलाच रंजक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संघ

  • मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लेंडल सिमन्स, मिचेल जॉन्सन, मिचेल मॅक्क्लिनॅघन, नितीश राणा, पार्थिव पटेल, सौरभ तिवारी, श्रेयस गोपाळ, टीम साऊथी, लसिथ मलिंगा, कृणाल पंडय़ा, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, असीला गुणरत्ने, हरभजन सिंग, हार्दिक पंडय़ा, जगदीश सुचित, जसप्रीत बुमराह, जोस बटलर, कर्ण शर्मा आणि विनय कुमार.
  • कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, ट्रेंट बोल्ट, पीयूष चावला, सुनील नरिन, नॅथन कल्टर-नील, कॉलिन डी ग्रँडहोम, रिषी धवन, सायन घोष, शकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, युसूफ पठाण, अंकित राजपूत, ख्रिस वोक्स, ख्रिस लिन, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणि उमेश यादव.

वेळ : रात्री ८.०० वा. पासून.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी मॅक्स आणि सोनी ईएसपीएन वाहिन्यांवर.