Arjun Tendulkar’s Mumbai Indians Exit: आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी अनेक संघात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात होणारा संजू सॅमसनच्या अदलाबदलीचा करार चर्चेत आहे. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघातही खेळाडूंची अदलाबदली होणार असल्याची माहिती क्रिकेट वर्तुळात चर्चेस आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मुंबई इंडियन्स शार्दूल ठाकूरला त्याच्या बेस प्राईजमध्ये संघात सामावून घेणार आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ अर्जुन तेंडुलकरला संघातून मुक्त करून त्याबदल्यात लखनौ सुपर जायंट्स संघातील मॅच विनर खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्याची तयारी करत आहे.

अर्जुनची आयपीएलमधील कामगिरी कशी?

२०२१ च्या हंगामात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये करारबद्ध केले होते. मात्र पाच वर्षांत अर्जुन तेंडुलकरला निळ्या जर्सीत मैदानावर उतरण्याची संधी केवळ पाचच वेळा मिळाली आहे. पहिले दोन हंगाम बसून राहिल्यानंतर २०२३ साली चार सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०२४ च्या हंगामात केवळ एकच सामना त्याला मिळाला. २०२५ च्या हंगामात त्याला एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही.

२०२३ साली चार सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर अर्जुनने चार विकेट्स मिळवल्या. तर २०२४ च्या हंगामातील एका सामन्यात त्याला विकेट मिळवता आली नाही. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात फलंदाजीमध्ये तो १३ धावा करू शकला.

अर्जुनच्या बदल्यात कोणता खेळाडू?

अर्जुन तेंडुलकरला एलएसजीकडे देऊन मुंबई इंडियन्सच्या संघाला अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर हवा आहे. याबाबतची माहिती क्रिकबझच्या बातमीत देण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची अधिकृत माहिती अद्याप दोन्ही संघानी जाहीर केलेली नाही. खेळाडूंच्या अदलाबदलीचे व्यवहार हे स्वतंत्रपणे आणि सरळ रोख हस्तांतरणाद्वारे होतात.

आयपीएल व्यापार करारांनुसार, खेळाडूंची अदलाबदली झाल्यास त्याची माहिती बीसीसीआयकडून अधिकृतरित्या जाहीर केली जाते. मुंबईच्या क्रिकेट वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स आणि एलएसजीमधील कराराच्या प्रक्रियेवर विचार सुरू आहे.

दोन वेळा आयपीएल ट्रॉफी विजेता संघाचा भाग

चेन्नई सुपर किंग्जने २०१८ आणि २०२१ साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी शार्दूल ठाकूर विजेता संघाचा भाग होता. तरीही मागच्या वर्षी जेद्दाह येथे झालेल्या लिलावात त्याला एकाही संघाने सामील करून घेतले नाही. अखेर लखनौने त्याला दोन कोटींच्या बेस प्राईजमध्ये स्वतःच्या संघात घेतले. २०२५ च्या हंगामात शार्दूल ठाकूरने १० सामन्यात १३ विकेट्स मिळवत उत्तम कामगिरी करून दाखवली.