Mumbai Indians World Record in T20: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ मधून लवकर बाहेर पडला. मुंबईने सुरूवात चांगली केली, पण संघाने सातत्याने सामने गमावल्याने त्यांना स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. पण या दरम्यान मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध सामन्यात पाकिस्तानचा मोठा विश्वविक्रम मोडत आपल्या नावे केला आहे. भलेही मुंबई इंडियन्सला केकेआरविरूद्ध पराभव पत्करावा लागला, पण संघाने ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावे केला आहे.

मुंबई इंडियन्सने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आपलं सोनेरी अक्षरांनी लिहिलं आहे, एक असा विक्रम जो आजवर कोणत्याच संघाने साध्य केला नव्हता. कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सने चार विकेट्सने सामना गमावला असला तरी, त्यांच्या गोलंदाजांनी एक विश्वविक्रम नावे केला आहे.

मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी या सामन्यात कोलकाताच्या सहा फलंदाजांना बाद केलं. या सहा विकेट्समुळे मुंबई इंडियन्स टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी फ्रँचायझी ठरली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सच्या नावावर आता ३१२ टी२० सामन्यांमध्ये एकूण १,८६२ विकेट्स झाल्या आहेत. या बाबतीत त्यांनी केवळ कोणताही क्लब किंवा फ्रँचायझीच नव्हे, तर एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संघाला मागे टाकलं आहे.

हेही वाचा

हा विक्रम यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर होता. आता मुंबई इंडियन्सने या फॉरमॅटमध्ये चार विकेट्स अधिक घेतल्या आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या ३०३ टी-२० सामन्यांमध्ये १८५८ फलंदाजांना बाद केलं असून, या यादीत ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहे.

जागतिक स्तरावर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या संघांच्या यादीत मुंबई इंडियन्स आणि पाकिस्ताननंतर इंग्लंडच्या काऊंटी संघांचं वर्चस्व आहे. या यादीत सॉमरसेट ३०३ सामन्यांमध्ये १,८२३ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर हॅम्पशायर २९६ सामन्यांमध्ये १,८०० विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर एसेक्सचा क्रमांक लागतो, ज्यांनी २७८ सामन्यांमध्ये १,७८७ विकेट्स घेतल्या आहेत.

सरेने २८६ सामन्यांमध्ये १,७७४ विकेट्स, मिडलसेक्सने २७२ सामन्यांमध्ये १,७५६ विकेट्स, केंटने २८० सामन्यांमध्ये १,७४३ विकेट्स आणि लीसेस्टरशायरने २७४ सामन्यांमध्ये १,७४२ विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघानेही २७४ सामन्यांमध्ये १,७४२ विकेट्स घेऊन या जागतिक यादीत स्थान मिळवलं आहे.

मुंबई इंडियन्सचे वर्चस्व केवळ त्यांच्या गोलंदाजीपुरतं मर्यादित नाही, तर चेंडूने धुमाकूळ घालणारा हा संघ, फलंदाजीमध्येही जगातील सर्वात धोकादायक संघांपैकी एक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रमही मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. संघात्या फलंदाजांनी मिळून ३१२ सामन्यांमध्ये ५०,७९२ धावा केल्या आहेत, ज्या टी-२० फॉरमॅटमधील कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक आहेत. ही आकडेवारी गेल्या दीड दशकात या फॉरमॅटमध्ये मुंबई इंडियन्सचे असलेले वर्चस्व दर्शवते.