शिवानी नाईक

बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीला क्रिकेट मनापासून आवडतं. क्रिकेट पाहायला आणि बोलायला दोन्ही आवडतं. तो क्रिकेट खेळतोही. यादृष्टीने तो पक्का मुंबईकर आहे. बाकी खेळातले बहुतांश खेळाडू क्रिकेट पाहतात. त्यांना ते आवडतं. भारतीय क्रिकेट संघ जिंकतो तेव्हा त्यांना प्रचंड आनंद होतो. ते मित्रमंडळींच्या बरोबरीने हा आनंद साजराही करतात. आयपीएल संघालाही फॉलो करतात. मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर आहे पण हे शहर आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी भरारी घेतलेल्या बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीचा आदरसन्मान करतं का? चिराग जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा दोनदा विजेता आहे. आशियाई तसंच आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकला आहे. थॉमस चषक म्हणजे बॅडमिंटनविश्वाचा वर्ल्डकप असलेल्या स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. मुंबईकरांना अभिमान वाटेल अशीच देदिप्यमान कामगिरी चिरागने केली आहे मात्र या शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम नाही, मोठी स्पर्धा होऊ शकेल असं ठिकाणही नाही हे शल्य आहे.

मुंबईत आता एक लाखापेक्षा क्षमतेचं क्रिकेट स्टेडियम उभं राहणार आहे. ठाणे जिल्ह्यात हे स्टेडियम होणार अशी चर्चा होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आता हे स्टेडियम नवी मुंबई परिसरात होणार आहे. या भव्य स्टेडियमसाठी जागेचा शोध पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. मुंबई आणि परिसरातलं हे पाचवं मोठं स्टेडियम असेल. दक्षिण मुंबईत वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, वांद्रे कुर्ला संकुलात शरद पवार जिमखाना क्रिकेट स्टेडियम, नवी मुंबईतलं डीवाय पाटील स्टेडियम यांच्या बरोबरीने आता एक मोठं स्टेडियम उभं राहणार आहे. मात्र एवढी स्टेडियम्स असूनही आयसीसीच्या स्पर्धांच्या फायनल्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या जातात. आतापर्यंत वानखेडे स्टेडियमवर फायनल्स होत असत. याच मैदानात महेंद्रसिंग धोनीने षटकार लगावला आणि भारतीय संघाने २०११ वर्ल्डकपच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र वानखेडे स्टेडियमची क्षमता मर्यादित आहे असं सांगून सामने अन्यत्र खेळवण्यात येत आहेत. सगळ्यात मोठं स्टेडियम कुठलं या शर्यतीत मुंबई मागे पडलं आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. बॉलीवूडनगरी अशीही मुंबईची ओळख आहे. याच शहरात देशातले श्रीमंत उद्योगपती राहतात. हे सगळं असलं तरी मुंबईत हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॉक्सिंग या खेळांसाठी एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम नाही.

ठाण्यात स्टेशनजवळ दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे. अ‍ॅथलेटिक्सपटूंकरता हे मैदान आशेचा किरण आहे. मात्र आयपीएल संघांच्या सरावासाठी अॅथलेटिक्स ट्रॅकचा मोठा भाग क्रिकेटने व्यापला आहे. अंधेरी क्रीडा संकुल न वापरल्यामुळे धूळ खात पडलं आहे. क्रिकेटेत्तर खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांसाठी ते उपयोगात आणलं जाऊ शकत नाही. चिराग शेट्टी मुंबईतच लहानाचा मोठा झाला आहे. मुंबईने देशाला वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटनपटू दिला आहे. पण चिरागच्या लाडक्या मुंबईत त्याच्या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम नाही तसंच सुपर ५०० म्हणजे बॅडमिंटन विश्वातील प्राथमिक म्हणावी अशी स्पर्धा आयोजित करता येईल असं केंद्रही नाही.

शहरातील अँग्लो इंडियन समाजाने हॉकीची आवड जोपासली. मात्र आता शहरातली हॉकीची परंपरा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. कूपरेज हे एकेकाळी शहरातल्या फुटबॉलचं माहेरघर होतं मात्र आता तेही उरलेलं नाही. क्रिकेट आणि हॉकीप्रमाणे दक्षिण मुंबईत फुटबॉलला स्वत:ची जागा हवी आहे पण तूर्तात ते दिवास्वप्न आहे. ठाणे-मुंब्रा परिसर तसंच पूर्वेकडच्या गोवंडीतील अ‍ॅथलेटिक्सपटूंना सराव करण्यासाठी स्टेडियमच नाही. नवी मुंबईच्या दिशेने खेळांचा लंबक सरकरणं म्हणजे मुख्य शहरात क्रीडा संस्कृती लयाला जाण्याचं द्योतक आहे. क्रिकेटनेच बहुतांश परीघ व्यापला आहे आणि त्यातूनच बाकी खेळांची, खेळाडूंची गळचेपी होते आहे.

जे खेळाडू क्रिकेटव्यतिरिक्त खेळ खेळतात त्यांना खेळण्यासाठी जागा हवेय पण शहरातले खाजगी क्लब आणि जिमखाने यांनी दारं बंद केल्याने प्रत्यक्ष जे खेळतात त्यांचं नुकसान होत आहे. दक्षिण मुंबईतले लब्ध प्रतिष्ठित या खाजगी जिमखान्यांमध्ये-क्लबमध्ये खेळतात पण खेळात करिअर करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. वरळीतल्या एनएससीआय, दक्षिण मुंबईतील सीसीआय तसंच बॉम्बे जिमखाना इथे फारतर राज्य अजिंक्यपद स्पर्धा भरवली जाऊ शकते. अलीकडे टाटा ओपन बॅडमिंटन स्पर्धा इथे होते. पण ही बॅडमिंटन विश्वातली प्राथमिक स्तराची स्पर्धा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडूंसाठी व्यासपीठ ठरेल असं बॅडमिंटन किंवा अन्य खेळांचं स्टेडियम मुंबईत नाही.

मुंबई हे कधीच फक्त क्रिकेटकेंद्रित शहर नव्हतं. मुंबईच्या नकाशावर अतिभव्य क्रिकेट स्टेडियम उभं राहिल्यामुळे शहर क्रिकेटपुरतं मर्यादित होईल असं नाही. वानखेडे स्टेडियममधला नॉर्थ स्टँड हा दर्दी क्रिकेटरसिकांचा कोपरा. देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या कट्टर चाहत्यांमध्ये त्यांची गणना होते. मुंबई शहर क्रिकेटमय होऊन राहणं हे नॉर्थ स्टँडच्या दर्दी क्रिकेटरसिकांनाही पटणारं नाही. सच्च्या क्रिकेटरसिकाला ऑलिम्पिक खेळांपैकी कोणता तरी एक खेळ नक्कीच आवडतो. क्रिकेटच्या सामन्यांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना कानकोंडलं वाटत नाही. सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर यांना मुंबईसाठी बॅडमिंटनचं महत्त्व काय विचारा.

कोणीही क्रिकेटचा दुस्वास करत नाही. मात्र शहरातून बाकी खेळ हद्दपार होत असताना क्रिकेटविषयी रोष वाढतो. कारण एकेकाळी मुंबई सगळे खेळ बहरात होते. या शहराने प्रत्येक खेळाला दर्जेदार खेळाडू दिले आहेत. २०२२ मध्ये भारताने थॉमस चषकाचं जेतेपद पटकावलं. चिरागचा या विजयात सिंहाचा वाटा होता. थॉमस चषक हा बॅडमिंटन विश्वातला वर्ल्डकप मानला जातो. २०११ मध्ये आपण क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकलो. त्या विजयाने क्रिकेटची लोकप्रियता अधिकच फोफावली. दुर्देवाने थॉमस चषक विजयानंतर बॅडमिंटन किंवा चिरागच्या बाबतीत तसं झालं नाही. खेळ कुठलाही असो- वर्ल्डकप सहजी जिंकता येत नाही. कबड्डीतल्या वर्ल्डकपचा अपवाद म्हणून पकडूया.

एशियन गेम्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मोजक्या मुंबईकर खेळाडूंमध्ये चिरागचा समावेश आहे. पण त्याला अभिमानाने मिरवता येईल, खेळता येईल असं स्टेडियम अख्ख्या शहरात नाही. जागतिक दर्जाचं मल्टीपरपझ स्टेडियमही नाही. क्रिकेटच्या नकाशावर मुंबईतली ठिकाणं वाढत असताना शहरात बाकी खेळांचा श्वास घुसमटला आहे. बाकी खेळांचा विषय निघाला की मुंबई एकदमच खुजं वाटू लागतं. शहराच्या गौरवशाली क्रीडा परंपरेला हे खुजेपण शोभणारं नाही.