मुंबई : विक्रमी ४२ वेळच्या रणजी विजेत्या मुंबई संघाचा पडद्यामागचा प्रवास आता जगभरातील क्रिकेटप्रेमींसमोर येण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) आगामी देशांतर्गत हंगामात वरिष्ठ संघाचा संपूर्ण प्रवास चित्रबद्ध करून त्यावर आधारित माहितीपट किंवा मालिका तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई संघाच्या तयारीपासून ते अखेरच्या सामन्यापर्यंतचा प्रवास कॅमेरात टिपण्याची ‘एमसीए’ची योजना आहे. खेळाडूंची सराव सत्रे, सामन्यापूर्वीची तयारी, संघातील वातावरण, खेळाडूंच्या भावना, आव्हाने आणि मैदानाबाहेरील घडामोडी यांचा समावेश यात केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण हंगामात मुंबई संघाने घेतलेली मेहनत आणि त्यांचे नियोजन क्रिकेटप्रेमींना प्रथमच जवळून पाहता येणार आहे.
‘‘मुंबईच्या वरिष्ठ संघाचा संपूर्ण हंगाम चित्रबद्ध करण्यासाठी आम्ही ‘बीसीसीआय’कडे काही परवानग्या मागितल्या आहेत. हा उपक्रम मालिका स्वरूपात असेल की माहितीपटाच्या रूपात, हे पुढील टप्प्यावर निश्चित केले जाईल. मात्र, संपूर्ण हंगामात मुंबई संघाच्या पडद्यामागे काय घडते, हे चाहत्यांना वेगळ्या पद्धतीने दाखवणे हा आमचा उद्देश आहे,’’ असे ‘एमसीए’चे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
‘द टेस्ट’च्या धर्तीवर…
ऑस्ट्रेलियन क्रिकेट २०१८च्या ‘सँडपेपर गेट’ प्रकरणाने हादरले होते. त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाच्या हंगामावर आधारित ‘द टेस्ट’ या गाजलेल्या मालिकेच्या धर्तीवर मुंबई संघाचा प्रवास मांडण्याची ‘एमसीए’ची योजना आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘एमसीए’ने दिग्दर्शक म्हणून पॅट्रिक ग्रॅहम यांची नियुक्ती केली आहे.
