Mumbai Ranji Trophy squad announced: रणजी करंडक २०२६-२७ चा हंगाम येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यादरम्यानच मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईचा संघ जाहीर केला आहे. मुंबईने दोन मराठमोळ्या खेळाडूंना संघाचं कर्णधार व उपकर्णधारपद दिलं आहे. तर उपलब्ध असूनही भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवची रणजी ट्रॉफीसाठी संघात निवड केलेली नाही. पाहूया कसा आहे संघ…
३४ वर्षीय सिद्धेश लाड मुंबई संघाचं नेतृत्व करेल, तर भारताला १९-वर्षांखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या आयुष म्हात्रेची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संघात यशस्वी जैस्वाल आणि सर्फराझ खान या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, स्वतःची उपलब्धता दर्शवूनही सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळालेलं नाही.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवड समितीने सोमवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. भारताने याच वर्षी टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद यशस्वीपणे राखलं, तेव्हा संघाचं नेतृत्व करणारा सूर्यकुमार यादव आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल या दोघांनीही आपण रणजी ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं निवड समितीला कळवलं होतं. मात्र, जाहीर झालेल्या संघात फक्त यशस्वी जैस्वालचं नाव आहे.
सूर्यकुमार यादवची मुंबई संघात निवड का करण्यात आली नाही? निवडकर्त्यांनी सांगितलं कारण
मुख्य निवडकर्ता राजेश पवार यांनी सूर्यकुमारला संघात स्थान न देण्यामागचं कारण स्पष्ट केलं. ते म्हणाले, “तो खूप मोठा खेळाडू आहे. मात्र, गेल्या दीड वर्षात त्याने लाल चेंडूचं क्रिकेट खेळलेलं नाही. त्याने काही सामने लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये खेळले, तर तो नक्कीच संघात पुनरागमन करू शकतो.”
गेल्याच आठवड्यात सूर्यकुमारला रणजी ट्रॉफी खेळण्याबाबत त्याची उपलब्धता आणि इच्छा विचारण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपला निर्णय कळवण्यासाठी एक दिवसाचा वेळ घेतला आणि अखेर रणजी खेळण्याची तयारी दर्शवली. मात्र, MCAच्या अधिकाऱ्यांनी सूर्यकुमारशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्याने त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
मुंबईचा रणजी ट्रॉफीमधील पहिला सामना ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये चंदीगडविरुद्ध होणार आहे. आगामी हंगामासाठी फक्त पहिल्या सामन्यासाठीच मुंबईच्या निवड समितीने संघाची घोषणा केली आहे. तर “यशस्वीची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वरिष्ठ संघात किंवा ‘अ’ संघात निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सध्या फक्त पहिल्या सामन्यासाठीच संघाची घोषणा केली आहे,” असं पवार यांनी स्पष्ट केलं.
रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ
सिद्धेश लाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आयुष म्हात्रे (उपकर्णधार), दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सर्फराझ खान, सुवेद पारकर, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूझा, ओंकार तरमळे
