Mumbai Ranji Squad For Second Match: रणजी ट्रॉफी २०२६-२७ हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील आमने पूर्ण झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघातील स्टार खेळाडू देखील खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. पण भारतीय संघाचा भाग असलेले खेळाडू या सामन्यात हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत. मुंबईकडून खेळताना यशस्वी जैस्वाल पूर्णपणे फ्लॉप राहिला. तर कर्नाटककडून खेळताना केएल राहुलही स्वस्तात माघारी परतला. आता दुसऱ्या सामन्यासाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून यशस्वी जैस्वालला वगळण्यात आलं आहे.
पहिल्या सामन्यात मुंबईचा दमदार विजय
मुंबईचा संघ पहिल्या सामन्यात चंदिगडचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने एक डाव आणि १५५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईचा संघ केवळ एकदाच फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल हवी तशी कामगिरी करू शकला नाही. तो या डावात शून्यावर माघारी परतला.
मुंबईच्या संघात मोठा बदल
मुंबईचा पुढील सामना १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी मुंबईला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात संघाचा उपकर्णधार आयुष म्हात्रे दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो जवळपास महिन्याभरासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज अंगकृष रघुवंशीला संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह युवा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेलाही संघात स्थान देण्यात आलं आहे.
सूर्यकुमार यादवला डच्चू, जैस्वाल बाहेर
यशस्वी जैस्वालला खराब फॉर्ममुळे संघाबाहेर करण्यात आलेलं नाही. तो भारतीय अ संघाकडून खेळण्यासाठी जाणार असल्याने त्याला मुंबईची साथ सोडावी लागली आहे. भारतीय अ संघ न्यूझीलंड अ संघाचा सामना करण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या संघात यशस्वी जैस्वालला देखील स्थान देण्यात आलं आहे. २४ ऑक्टोबरपासून भारत अ आणि न्यूझीलंड अ या दोन्ही संघांमध्ये ३ अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये तो भारतीय अ संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. यासह सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
असा आहे मुंबईचा संघ: सिद्धेश लाड (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, सूर्यांश शेडगे, दिव्यांश सक्सेना, सर्फराज खान, मुशीर खान, सुवेद पारकर, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), तनुष कोटीयन, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डी, ओंकार तरमळे
