मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई ट्वेन्टी-२० लीग क्रिकेटचा शेवट अपेक्षेप्रमाणेच रोमहर्षक ठरला. सूर्यकुमार यादवसारखा एखादा अनुभवी खेळाडू चमकला, परंतु बाकीच्या नव्या गुणी खेळाडूंनी अंतिम फेरीवर छाप पाडली. त्यामुळेच यशस्वीतेची ग्वाही देणाऱ्या या लीगच्या अंतिम सामन्यात मुंबई नॉर्थ-ईस्ट ट्रम्फ नाइट्सने शिवाजी पार्क लायन्सचा ३ धावांनी पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.

मुंबई नॉर्थ-ईस्ट ट्रम्फ नाइट्सने प्रथम फलंदाजी करताना अनपेक्षितपणे ५ बाद १८२ धावा उभारल्या. सिद्धार्थ राऊतने तिसऱ्या आणि रॉयस्टन डायसने चौथ्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर दोन बळी घेण्याची किमया साधल्यामुळे ट्रम्प नाइटसची दयनीय अवस्था झाली. पहिल्या सहा षटकांमध्ये ट्रम्प नाइट्सचा निम्मा संघ ३४ धावांत गारद झाला, तेव्हा हा संघ धावांचे शतकसुद्धा ओलांडण्याची शक्यता वाटत नव्हती. परंतु  सूर्यकुमार यादव आणि परिक्षित वळसांगकर यांनी ते करून दाखवले. अगदी १०व्या षटकापर्यंत ट्रम्प नाइट्सच्या धावसंख्येवर ४८ धावा जमा होत्या. परंतु उर्वरित १० षटकांत या जोडीने १३४ धावा काढल्या. या जोडीने सहाव्या विकेटसाठी ८४ चेंडूंत १४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सूर्यकुमारने ७ चौकार आणि ७ षटकारांसह ४२ चेंडूंत नाबाद ९० धावा काढल्या, तर परिक्षितने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या.

त्यानंतर, शिवाजी पार्कच्या डावात षटकाराने खाते उघडणारा पॉल व्हल्थाटी फार काळ टिकू शकला नाही. मग कर्णधार ब्राविश शेट्टीने वेगाने ३२ धावा केल्या. अल्पेश रामजानी (४८) आणि हार्दिक तामोरे यांनी चौथ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली.  शशांक सिंगच्या अखेरच्या षटकात शिवाजी पार्कला विजयासाठी २६ धावांची आवश्यकता होती. मात्र शिवम दुबेने २२ धावा पाच चेंडूंत फटकावून आशा निर्माण केल्या. परंतु अखेरच्या चेंडूवर चौकार मारण्यात तो अपयशी ठरला आणि विजय त्यांच्या हातून निसटला. या सामन्याला सुमारे २० हजार क्रिकेटरसिकांनी हजेरी लावली.

संक्षिप्त धावफलक

मुंबई नॉर्थ-ईस्ट ट्रम्फ नाइट्स : ५ बाद १८२ (सूर्यकुमार यादव नाबाद ९०, परिक्षित वळसांगकर नाबाद ५९; सिद्धार्थ राऊत २/११ ) विजयी वि. शिवाजी पार्क लायन्स :  ७ बाद १७९ (अल्पेश रामजानी ४८, हार्दिक तामोरे ३९, शिवम दुबे नाबाद ३३, ब्राविश शेट्टी ३२; वैभव सिंग ३/३८)