मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या नव्या हंगामाची दमदार सुरुवात करणार्‍या मुंबईची आज, रविवारपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या लढतीत बिलासपूर येथे हिमाचल प्रदेश संघाशी गाठ पडणार आहे. सलामीच्या लढतीत घरच्या मैदानावर चंडीगडचा एक डाव आणि १५५ धावांनी धुव्वा उडवल्याने मुंबई संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता हिमाचलविरुद्धही विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान भक्कम करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

या सामन्यात मुंबईला काही महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती जाणवू शकते. यशस्वी जैस्वाल भारत ‘अ’ संघाच्या न्यूझीलंड दौर्‍यामुळे उपलब्ध नसेल. तसेच गेल्या लढतीत आयुष म्हात्रेला पायाची दुखापत झाल्याने तो एक ते दीड महिना मैदानाबाहेर राहणार आहे. त्यामुळे सलामीची नवी जोडी शोधण्याचे मुंबईसमोर आव्हान असून अंगक्रिश रघुवंशी आणि दिव्यांश सक्सेना यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज सर्फराज खान आणि कर्णधार सिद्धेश लाड यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. मुशीर खानकडूनही फलंदाजीसह फिरकी गोलंदाजीत योगदानाची अपेक्षा आहे. शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांची फिरकी, तर तुषार देशपांडेची वेगवान गोलंदाजी मुंबईसाठी निर्णायक ठरू शकते.

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचा कस लागणे अपेक्षित आहे. पुखराज मानच्या नेतृत्वाखालील हिमाचल संघाला फलंदाजांकडून मोठ्या धावांची गरज आहे. आकाश वशिष्ठची अष्टपैलू कामगिरी आणि अर्पित गुलेरियाची वेगवान गोलंदाजी यजमानांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

शुभमन गिलकडे लक्ष

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल रणजी स्पर्धेच्या दुसर्‍या साखळी लढतीत पंजाबकडून सहभाग नोंदवणार आहे. आगामी न्यूझीलंड

दौर्‍यापूर्वी लाल चेंडूचा सराव मिळावा यासाठी त्याने रणजीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब संघासमोर छत्तीसगडचे आव्हान असेल.

महाराष्ट्राला ऋतुराजमुळे बळकटी

महाराष्ट्राचा संघ यंदाच्या रणजी हंगामात प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार असून त्यांचा झारखंडशी सामना होणार आहे. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विजयी सलामी देताना सेनादलाचा पराभव केला होता. आता तारांकित फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या पुनरागमनामुळे महाराष्ट्र संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. ऋतुराज आणि अंकित बावणे यांच्यावर मधल्या फळीला स्थिरता देण्याची जबाबदारी असेल. गेल्या सामन्यात डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालने सेनादलविरुद्ध दुसर्‍या डावात पाच बळी मिळवले होते. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमची खेळपट्टीही फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असल्याने पुन्हा ओस्तवाल, तसेच हितेश वाळुंजची भूमिका निर्णायक ठरू शकते.

विदर्भासमोर गतविजेत्यांचे आव्हान

गेल्या दोन रणजी हंगामांतील विजेते विदर्भ आणि जम्मू-काश्मीर यंदा दुसर्‍याच साखळी लढतीत आमनेसामने येणार आहे. विदर्भाच्या संघाने पहिल्या सामन्यात पुदुच्चेरीवर वर्चस्व गाजवले. मात्र, आता त्यांना गतविजेत्यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असून ही लढत श्रीनगर येथे होणार असल्याने अपरिचित परिस्थितीत विदर्भ संघाची कसोटी लागेल. जम्मू-काश्मीरकडे शुभम खजुरिया, पारस डोगरा आणि अब्दुल समद यांच्यासारखे गुणवान फलंदाज आहेत. अकिब नबी गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावेल. विदर्भासाठी डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे, कर्णधार अक्षय वाडकर आणि यश राठोड यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

’ वेळ : सकाळी ९.३० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स खेल, जिओहॉटस्टार ॲप. (निवडक सामने)