मुंबई : अनुभवी फलंदाज केदार जाधवने (१६८ चेंडूंत १२८ धावा) आपली लय कायम राखताना साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या बळावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटाच्या सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३१४ अशी धावसंख्या केली.

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासाठी दोन्ही संघांना किमान पहिल्या डावात आघाडीची आवश्यकता आहे. त्यामुळे मंगळवारपासून मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघ झुंजार खेळ करताना दिसले.

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Rishabh pant hitting bat screen video viral
IPL 2024, RR vs DC : ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं, ज्याचा VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

मुंबईने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सुरुवातीच्या षटकांत तुषार देशपांडेने सलामीवीर पवन शाह (०), तर मोहित अवस्थीने लयीत असलेल्या नौशाद शेखला (१२) बाद करत महाराष्ट्राला अडचणीत टाकले. महाराष्ट्राची २ बाद २३ अशी स्थिती झाली होती. युवा सलामीवीर सिद्धेश वीर (११३ चेंडूंत ४८) आणि केदार यांनी १०५ धावांची भागीदारी रचत महाराष्ट्राचा डाव सावरला. सिद्धेश सावध फलंदाजी करत असताना केदारने धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने सिद्धेशला बाद करत ही जोडी फोडली. तसेच कर्णधार अंकित बावणेला (१) अवस्थीने बाद केले.

एका बाजूने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने ३७ वर्षीय केदारने मुंबईच्या गोलंदाजांचा उत्तम प्रतिकार केला. त्याने यंदाच्या हंगामातील दुसरे आणि प्रथम श्रेणी कारकीर्दीतील १६वे शतक साकारले. त्याला अझीम काझीने (८७ चेंडूंत २९) चांगली साथ दिली. या दोघांनी ८६ धावांची भागीदारी केली. परंतु काही षटकांच्या अंतराने मुलानीने काझीला, तर देशपांडेने केदारला माघारी पाठवले. केदारने १६८ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १२८ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर सौरभ नवले (६७ चेंडूंत नाबाद ५६) आणि आशय पालकर (६२ चेंडूंत नाबाद ३२) यांनी ८७ धावांची अभेद्य भागीदारी रचली.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र (पहिला डाव) : ८७ षटकांत ६ बाद ३१४ (केदार जाधव १२८, सौरभ नवले नाबाद ५६, सिद्धेश वीर ४८; तुषार देशपांडे २/६४, मोहित अवस्थी २/७०, शम्स मुलानी २/१०५)

आजारी असल्याने सर्फराज सामन्याबाहेर

महाराष्ट्राविरुद्ध मंगळवारपासून सुरू झालेल्या निर्णायक रणजी सामन्यात मुंबईला प्रमुख फलंदाज सर्फराज खानविनाच खेळावे लागते आहे. सर्फराजला ताप आला असून अशक्तपणाही जाणवतो आहे. त्याच्या जागी सुवेद पारकरला मुंबईच्या संघात स्थान मिळाले.