वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीच्या (१९ धावांत ४ बळी) भेदक माऱ्याच्या बळावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत आसामवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अभिषेक नायर आणि सागर त्रिवेदी यांनी प्रत्येकी तीन बळी घेत आसामचा डाव गुंडाळण्यात धवलला साहाय्य केले.

रेल्वे रिक्रिएशन क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईचे १९९ धावांचे लक्ष्य आसामला पेलता आले नाही. ३५ षटकांत १०२ धावांत त्यांचा डाव आटोपला.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि १ बाद ६० अशी सुरुवात केली. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ४९ (६५ चेंडूंत) धावा केल्या. मात्र मधली फळी कोसळल्यामुळे मुंबईची ७ बाद ११८ अशी अवस्था झाली. याचप्रमाणे सूर्यकुमार यादवने (४२), धवल कुलकर्णी (नाबाद २१) सोबत आठव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्रिवेदीनेही तीन चौकार आणि एका षटकारासह १९ चेंडूंत २४ धावा केल्या. त्यानंतर ४९.५ षटकांत मुंबईचा डाव १९८ धावांत गडगडला.
मग कुलकर्णीने आसामचे सलामीवीर पल्लवकुमार दाव आणि शिवशंकर रॉय यांना तंबूची वाट दाखवली. त्यानंतर नायर आणि त्रिवेदीने आसामच्या मधल्या फळीला हादरे दिले. अमित वर्माने ३३ आणि जमालुद्दिन मोहम्मदने २५ धावा काढून आसामकडून प्रतिकार केला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : ४९.५ षटकांत सर्व बाद १९८ (श्रेयस अय्यर ४९, सूर्यकुमार यादव ४२, सागर त्रिवेदी २४; जमालुद्दिन मोहम्मद २/२४, अमित वर्मा २/२३) विजयी वि. आसाम : ३५ षटकांत सर्व बाद १०२ (अमित वर्मा ३३, जमालुद्दिन मोहम्मद २५; धवल कुलकर्णी ४/१९, सागर त्रिवेदी ३/२९, अभिषेक नायर ३/३७)