रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

नाटय़पूर्ण लढतीत तामिळनाडूवर एक विकेट राखून विजय
सामन्याला प्रत्येक क्षणाला मिळणारी कलाटणी.. कधी पारडे एकिकडे तर क्षणार्धात दुसरीकडे.. नाटय़पूर्ण घटनांचा एकच ‘कोलाज’ समोर घडत होता आणि पाहणारा प्रत्येक जण त्यामध्ये गुंगला होता.. कोणता संघ सामना जिंकेल, हे सांगण्याचे धारिष्टय़ कुणीच दाखवत नव्हते.. हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यात प्रत्येकावर दडपण होते.. शेवटच्या काही क्षणात मुंबईला जिंकायला दोन धावा आणि तामिळनाडूला जिंकायला एक बळी हवा असताना उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती.. मुंबईचे सारे महत्त्वाचे फलंदाज परतले होते.. ६१व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अखेर बलविंदसिंग संधूने लाँग ऑनला फटका मारत दोन धावा केल्या आणि मुंबईच्या संघाने एकच जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला, तर चाहत्यांनी ‘हुश्श.. मुंबई जिंकली एकदाची’ असे म्हणत सुस्कारा सोडला. सहज जिंकता येणारा सामना मुंबईच्या फलंदाजांनी विकेट आंदण देत अखेरच्या फलंदाजापर्यंत आणला होता. परंतु मुंबईने तामिळनाडूवर नाटय़पूर्ण लढतीत एका विकेटने विजय मिळवत ६ गुणांची कमाई केली.
चौथ्या दिवशी ७ षटकांमध्ये २२ धावांची भर घालून तामिळनाडूचा दुसरा डाव आटोपला. फिरकीपटू विशाल दाभोळकरने ७ बळी घेत तामिळनाडूला ९५ धावांमध्ये रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
विजयासाठी २३६ धावांचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्याच षटकात सलामीवीर श्रीदीप मंगेलाला शून्यावर गमावले. मग अखिल हेरवाडकर (२३) व श्रेयस अय्यर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली. अखिलला १७ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही. रंगराजनने अखिलचा अडसर दूर केला. मग कर्णधार आदित्य तरे (८) फार काळ टिकू शकला नाही. पंचांच्या निर्णयावर नाखूश होत तरेने मैदान सोडले. पण श्रेयसने गोलंदाजांचा चांगला समाचार घेत अर्धशतक झळकावले.
श्रेयस आणि सूर्यकुमार यादव यांनी उपहारानंतर प्रत्येक षटकामागे जवळपास सहा धावा घेत संघाला विजयासमीप आणले. पण राहिल शाहला स्वीप मारण्याच्या नादात श्रेयस मुरली विजयकडे झेल देऊन बसला. त्याने ७१ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ८३ धावांची तडफदार खेळी साकारली. श्रेयस बाद झाल्यावर धावगती मंदावली असली, तरी सूर्यकुमार आणि सिद्धेश लाड (२९) या दोघांनी स्थिरस्थावर झाल्यावर तामिळनाडूच्या गोलंदाजीवर दुहेरी हल्ला चढवायला सुरुवात केली. या नादात सिद्धेश सोपा झेल देऊन माघारी परतला.
चहापानाला मुंबईने ५ बाद २०८ धावा करून विजयाची आशा दाखवली. पण सूर्यकुमार (५८) बाद झाला आणि मुंबईला मोठा धक्का बसला. मग धवल कुलकर्णी (०) आणि शार्दुल ठाकूर (२) यांनी निराशा केल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली. एक बाजू सावणारा अभिषेक राऊतही (२२) विजयासाठी चार धावा हव्या असताना बाद झाला आणि सामना दोलायमान अवस्थेत आला. पण संधू (नाबाद ३) आणि विशाल दाभोळकर (२) यांनी अखेरच्या चार धावा करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : ४३४
मुंबई (पहिला डाव) : २९४
तामिळनाडू (दुसरा डाव) : सर्वबाद ९५, एम. रंगराजन ३३; विशाल दाभोळकर ७/५३)
मुंबई (दुसरा डाव) : (श्रेयस अय्यर ८३, सूर्यकुमार यादव ५८; एम. रंगराजन ३/४४).

सामना फारच अटीतटीचा झाला. आम्हीही दडपणाखाली होतो. पण अखेर सामना जिंकल्याने आनंदी आहे. प्रत्येक सत्रामध्ये पारडे एकीकडून दुसरीकडे झुकत होते. हा एक सांघिक विजय असून या सामन्यातून आम्हाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
– चंद्रकांत पंडित,
मुंबईचे प्रशिक्षक