भारताच्या माजी खेळाडूने गौतम गंभीरसारख्या कोचला बराच काळ त्या पदावर ठेवण्याचा बीसीसीआयला सल्ला दिला आहे. मुनाफ पटेलने भारतीय क्रिकेटला इशारा दिला आहे. “लक्षात ठेवा गौतम गंभीरसारखा मुख्य प्रशिक्षक निघून गेला तर खेळाडूंना हाताळणं कठीण होईल.” बीसीसीआयला हा सल्ला देणारा खेळाडू भारताचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल आहे.
बॉम्बे स्पोर्ट्स एक्सचेंज या टाईम्स ऑफ इंडियाच्या युट्युब शोमध्ये बोलताना मुनाफ पटेलने हे वक्तव्य केलं. त्यामागील त्याचं कारण अगदी सोपं आहे. भारतीय क्रिकेटच्या ज्या स्तरावर आहे, जिथे विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये असतात, तिथे पारंपरिक कोचिंगला फारसे महत्त्व राहत नाही. प्रत्येक अव्वल खेळाडूकडे स्वतःचा ट्रेनर, स्वतःची सपोर्ट टीम आणि स्वतःची वेगळी दुनिया असते. “या स्तरावर तुम्ही नेमकं काय कोचिंग करणार? खेळाडूंना योग्य पद्धतीने मॅनेज करणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं.”
मुनाफच्या मते, या स्तरावर ‘मॅन-मॅनेजमेंट’ करणं सोपं नाही. “विराट कोहलीला एखाद्या गोष्टीसाठी ‘नाही’ म्हणणारा कोणीतरी दाखवा. रोहित शर्मालाही ‘नाही’ म्हणणारा कोणीतरी दाखवा,” असं तो म्हणाला. मुनाफच्या दृष्टीने, गौतम गंभीरकडे एक साधी पण दुर्मिळ गोष्ट आहे कोणत्याही खेळाडूला, अगदी मोठ्या नावांनाही, संघाबाहेर करण्याची धमक त्याच्यामध्ये आहे.
“तो एक खरा माणूस आहे, तो खरं तेच बोलते आणि हिच त्याची (गौतम गंभीर) गोष्ट सर्वांना भावते. जर गोष्टी हाताबाहेर गेल्या तर त्या खेळाडूला संघातून ड्रॉप करण्याचं धाडस त्याच्यात आहे.” मुनाफच्या मते, हीच भीती संघाला केवळ व्यक्तींचा समूह न राहता एकसंध टीम म्हणून काम करण्यास भाग पाडते.
मुनाफ पटेलने हे स्पष्ट सांगितलं की गंभीर हे पैशासाठी करत नाही. त्याच्या मते, आयपीएलमधील दहा फ्रँचायझी त्याला उद्या संधी देतील. “त्याला पैशांची काही गरज नाही.” तो इथे आहे कारण त्याला क्रिकेटची खरी आवड आहे आणि मुनाफच्या मते, याच कारणामुळे तो यशस्वी ठरत आहे. मुनाफ पटेल पुढे हे देखील म्हणाला, जितके वर्ष त्याला या पदावर ठेवता येईल तितका काळ ठेवा. कारण त्याच्यासारखा माणूस तुम्हाला परत नाही मिळणार.”
मुनाफ पटेल सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. खेळलेल्या चार सामन्यांमधून चार गुणांसह दिल्ली कॅपिटल्स सध्या पाचव्या स्थानावर आहे.
