करोना काळात क्रिकेट खेळाडूंसाठी विलगीकरणाची प्रक्रिया आणि बायो बबल निर्बंधांमुळे जीवन कठीण झाले आहे. मात्र लसीकरणानंतर विलगीकरण दिवसांची संख्या कालांतराने कमी झाली आहे. बहुतेक वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटूंना आधीच लसीकरण केले गेले आहे, परंतु देशांतर्गत क्रिकेटसाठी असे म्हणता येणार नाही. भारतीय संघाचा सलामीवीर मुरली विजयबद्दल आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटचा चेहरा ओळखला जाणारा मुरली विजय कोविड १९ची लस घेऊ इच्छित नसल्याची माहिती समोर आली आहे.

“हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. तो लस घेण्यास कचरतो आहे. बीसीसीआयचे करोनासंदर्भातील नियम सांगतात की टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी एक आठवडा आणि नंतर खेळाडू संघासोबत असेपर्यंत खेळाडूने बायो बबलमध्ये असणे आवश्यक आहे. पण विजय त्याबद्दल फारसा उत्सुक नाही. त्यामुळे तामिळनाडूच्या निवडकर्त्यांनी त्याला निवडीसाठी विचारात घेतले नाही,” असे एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

बीसीसीआय सध्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या देशांतर्गत टी-२० स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि बोर्डाने सर्व खेळाडूंना करोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी कोविड-१९ लस घेणे अनिवार्य केले आहे. मात्र मुरली विजयला बायो बबलमध्ये राहायचे नाही आणि त्यामुळे तो तामिळनाडू संघ आणि टूर्नामेंटपासून दूर आहे, तसेच क्रिकेटपासूनही दूर आहे.

‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुरली विजय जरी करोना नियम पाळत असला तरी त्याच्या संघातील निवडीची खात्री नाही. कारण मुरली विजयने दोन वर्षांहून अधिक काळ कोणतीही देशांतर्गत स्पर्धा खेळलेली नाही. मुरलीने मागील दोन आयपीएल हंगाम देखील गमावले आणि २०१९ मध्ये कर्नाटक विरुद्ध तामिळनाडूसाठी शेवटचा सामना खेळला. त्यामुळेच निवड समितीने त्यांच्या बैठकीत त्याच्याबद्दल चर्चाही केली नाही.

मुरलीने भारतासाठी ६१ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ३८.३ च्या सरासरीने ३८९२ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी व्यतिरिक्त, त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली आहे, जिथे त्याने १७ सामन्यांमध्ये ३३९ धावा केल्या आहेत. २०१८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मुरली विजयने संघासाठी शेवटची कसोटी खेळली होती. येथे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत केले होते.