Murali Sreeshankar wins silver medal in CWG 2026 long jump: भारताने २०२६ च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) पदकांची रांग लावत आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. आता भारताने आपलं १३वं पदक जिंकलं आहे. ॲथलेटिक्समधील भारताला पदकाची आशा असलेल्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. बुधवार, २९ जुलै रोजी झालेल्या लांब उडीच्या अंतिम फेरीत, भारताचा अव्वल दर्जाचा जंपर मुरली श्रीशंकरने ८.०९ मीटरची उडी मारून रौप्य पदक जिंकलं आणि इतिहास घडवला.
दुखापतीनंतर शानदार पुनरागमन; श्रीशंकरची ८.०९ मीटरची यशस्वी उडी
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुरली श्रीशंकरने लांब उडीप्रकारामध्ये रौप्य पदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ आहे; तो अवघ्या ६ सेंटीमीटरच्या फरकाने सुवर्णपदक जिंकण्यापासून हुकला. ग्लासगोच्या स्कॉट्सटौन स्टेडियममध्ये ॲथलेटिक्स स्पर्धांअंतर्गत लांब उडीची अंतिम फेरी पार पडली. श्रीशंकरने पात्रता फेरीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं होतं. यानंतर दुसऱ्याच प्रयत्नात ८.०९ मीटर उडी मारत त्याने रौप्यपदक पटकावलं. या कामगिरीसह, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) लांब उडी प्रकारात दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
साहजिकच, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्याने पदक पटकावलं. श्रीशंकरसाठी हे पुनरागमन विशेष महत्त्वाचं होतं, कारण गेल्या दोन वर्षांपासून तो दुखापतींशी झुंज देत होता; तरीही, जेव्हा तो उडी मारण्यासाठी सज्ज झाला, तेव्हा दुखापतींच्या समस्यांनंतरच्या या मोठ्या स्पर्धेबाबत त्याच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात तसूभरही दडपण किंवा अस्वस्थता दिसून आली नाही.
श्रीशंकरने अंतिम फेरीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८.०२ मीटरची उडी मारून दमदार सुरुवात केली. त्यावेळी तो दुसऱ्या स्थानावर होता, तर अन्य दोन स्पर्धक ८.०८ मीटरच्या अंतरासह संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. त्यानंतर, दुसऱ्या प्रयत्नात श्रीशंकरने ८.०९ मीटरची शानदार उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. मात्र, त्याचे पुढील दोन प्रयत्न ‘फाऊल’ ठरले आणि तिथेच त्याची लय बिघडली. दुसऱ्या स्थानावर असलेल्या जमैकाच्या ताजे गेलने ८.१५ मीटरचं अंतर गाठत अव्वल स्थान मिळवलं. त्यानंतरच्या दोन प्रयत्नांत श्रीशंकरला ही कामगिरी मागे टाकता आली नाही आणि त्याला दुसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.
मुरली श्रीशंकरने २०२२ मध्ये बर्मिंगहॅममध्येही रौप्य पदक जिंकलं होतं आणि त्यावेळी अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. श्रीशंकरव्यतिरिक्त लोकेश सत्यनाथन यानेही भारताकडून अंतिम फेरीत सहभाग घेतला होता; मात्र, त्याची सर्वोत्तम उडी ७.९७ मीटरची होती आणि तो पाचव्या स्थानावर राहिला.
