Musheer Khan Century in India B vs India A Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफीला ५ सप्टेंबरपासून म्हणजेच गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत अ आणि भारत ब यांच्यात सामना खेळला जात आहे. भारत ब संघाचा कर्णधार अभिमन्यू इसवरन आहे. मुंबईकडून क्रिकेट खेळणारे दोन भाऊ सरफराज खान आणि मुशीर खान भारत ब संघाकडून खेळत आहे. मुशीर खानने पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कामगिरी करत दमदार शतक झळकावले. जिथे एकीकडे इतर फलंदाज धावा करण्यासाठी धडपडत होते, तिथे मुशीर खानने शतक झळकावले आहे. दुलीप ट्रॉफी सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रात भारत अ संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, तर दिवसाच्या शेवटच्या सत्रात १९ वर्षीय मुशीर खानने आपल्या शतकाने सर्वांची मने जिंकली. दिवसाच्या पहिल्याच सत्रात मुशीर फलंदाजीसाठी मैदानात आला आणि त्यानंतर त्याने एका टोकाला पाय रोवून उभा राहत संघाच्या धावांची जबाबदारी घेतली, त्यानंतर त्याने २०४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हेही वाचा - Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या कॅचची तुफान चर्चा, मागे धावत जात ऋषभ पंतच्या शॉट्चा टिपला अफलातून झेल, VIDEO व्हायरल १९ वर्षीय मुशीर खान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मुशीरने संयम दाखवत चांगली फलंदाजी केली. मुशीर खानने २०५ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह शतक पूर्ण केले. यानंतरही तो अजूनही मैदानात कायम आहे. मुशीर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. खानच्या बॅटने अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही चांगली कामगिरी केली होती. मुशीर खानने आवेश खान, कुलदीप यादव, आकाशदीप, खलील अहमद, शिवम दुबे आणि तनुष कोटियन यांच्याविरुद्ध फलंदाजी केली. या ६ गोलंदाजांपैकी ५ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंविरुद्ध शानदार फलंदाजी करत त्याने आपली कामगिरी दाखवून दिली आहे. हेही वाचा - Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाने राजकारणात ठेवले पाऊल, पत्नी रिवाबा जडेजाने फोटो शेअर करत दिली माहिती भाऊ सर्फराज खानच्या जागी मुशीरची भारतीय संघात निवड होणार? २०२४ च्या सुरूवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्फराज खानने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले आणि शानदार फलंदाजी केली. पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आता ऋषभ पंतही तंदुरुस्त झाला असून इतर वरिष्ठ खेळाडूही संघात उपस्थित आहेत. त्यामुळे सर्फराजला संधी मिळेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुशीरच्या या कामगिरीवरून तो भाऊ सर्फराजच्या आतापर्यंतच्या कामगिरीला कडवी टक्कर देत आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुशीर खानला संघा संधी देणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. हेही वाचा - गंभीर आजाराशी लढा देतोय ‘हा’ भारतीय वंशाचा क्रिकेटपटू, दिल्लीतील रूग्णालयात ICUमध्ये केलं दाखल भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून घरच्या मैदानावर २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये सर्व वरिष्ठ खेळाडूही सहभागी होत आहेत. या स्पर्धेत कामगिरी करणारा खेळाडू आगामी बांगलादेश मालिकेत टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतो. यासह भारताला येत्या काळात १० कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर मुशीर खानलाही टीम इंडियामध्ये पदार्पणाची चांगली संधी आहे.