Musheer Khan century and six wickets Ranji Trophy match: रणजी ट्रॉफी २०२६-२७च्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात मुशीर खानने मुंबईकडून खेळताना इतिहास घडवला. हरियाणाविरूद्धच्या या सामन्यात त्याने प्रथम शतक झळकावलं आणि त्यानंतर गोलंदाजी करताना सहा बळी घेतले; त्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे हरियाणाचा संघ पहिल्या डावात २७० धावांत सर्वबाद झाला. या अनोख्या कामगिरीसह मुशीर खानने रणजी ट्रॉफीत इतिहास घडवत ३६ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. मुशीर खान हा भारतीय फलंदाज सर्फराझ खानचा भाऊ आहे.

मुशीर खान मुंबईसाठी रणजी ट्रॉफीच्या एकाच सामन्यात शतक झळकावणारा आणि पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा केवळ सहावा खेळाडू ठरला आहे. मुशीरच्या आधी, १९९०-९१ च्या रणजी हंगामात दिग्गज रवी शास्त्री यांनी ही कामगिरी केली होती. हरियाणाविरुद्धच्या सामन्यातील सुरूवातीचे ५ बळी हे एकट्या मुशीरने घेतले.

मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खानने हरियाणाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार कामगिरी करत दुर्मिळ विक्रमाची नोंद केली. शतक झळकावल्यानंतर गोलंदाजीतही त्याने कमाल केली. मुशीरने ८५ धावांत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईने पहिल्या डावात हरियाणावर १६० धावांची मोठी आघाडी मिळवली.

हरियाणाच्या निशांत सिंधूने एका बाजूने किल्ला लढवत नाबाद १०५ धावा केल्या, ज्यामुळे त्याच्या संघाला काहीसा दिलासा मिळाला. मुंबईने पहिल्या डावात ४३० धावा केल्या होत्या; प्रत्युत्तरात, हरियाणाचा संघ २७० धावांत सर्वबाद झाला, ज्यामुळे यजमान मुंबईला १६० धावांची आघाडी मिळाली. सलग तिसऱ्या विजयाचे आणि त्यासह बोनस गुणाचे लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने, मुंबईने हरयाणाला फॉलोऑन दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हरियाणाने त्यांच्या दुसऱ्या डावात २ बाद ७३ धावा केल्या होत्या. ते अजूनही ८७ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या हातात आठ बळी (विकेट्स) शिल्लक आहेत.

सलामीवीर फलंदाज हिमांशू राणा याला सिल्वेस्टर डिसोझाचा चेंडू हेल्मेटवर लागल्यामुळे मैदान सोडावं लागलं, तेव्हा हरियाणाचा संघ अधिक अडचणीत सापडला. त्याआधी, कर्णधार अंकित कुमारला तनुष कोटियनने बाद केलं होतं. दुसऱ्या डावात सिंधू २२ धावांवर फलंदाजी करत होता, तर यशवर्धन दलाल १३ धावांवर नाबाद होता. अखेरच्या दिवशी त्या खडबडीत झालेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं हरियणासाठी अधिक अवघड असणार आहे.