बलाढय़ पंजाबवर ४५ धावांनी मात; कर्णधार राहुलचे दमदार अर्धशतक :- कर्णधार राहुल त्रिपाठीने (नाबाद ६३) पाच सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर साकारलेल्या झंझावाती अर्धशतकाला अझीम काझीच्या (नाबाद ७१) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे महाराष्ट्राने सोमवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ पंजाबला ४५ धावांनी धूळ चारली. सात सामन्यांतून पाचव्या विजयाची नोंद करणाऱ्या महाराष्ट्राने ‘क’ गटात अग्रस्थान मिळवून दिमाखात अव्वल साखळीत स्थान मिळवले.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने २० षटकांत ४ बाद २०१ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (१४), केदार जाधव (११) यांनी निराशा केल्यामुळे एक वेळ महाराष्ट्राची ४ बाद ९० धावा अशी अवस्था झाली होती; परंतु त्रिपाठी आणि काझी यांनी पाचव्या गडय़ासाठी १११ धावांची अभेद्य भागीदारी रचून महाराष्ट्राला द्विशतकी धावसंख्या गाठून दिली. २८ वर्षीय त्रिपाठीने चार चौकार आणि पाच षटकारांसह २७ चेंडूंतच ६३ धावा फटकावल्या, तर काझीने आठ चौकार आणि तीन षटकारांसह ३६ चेंडूंत ७१ धावा काढून त्रिपाठीला योग्य साथ दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार मनदीप सिंगने ४९ चेंडूंत ६७ धावा फटकावून संघाला दमदार सुरुवात करून दिली; परंतु अनमोलप्रीत सिंग (३६) वगळता अन्य एकही फलंदाज २०हून अधिक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे पंजाबला २० षटकांत ७ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. २१ वर्षीय मध्यमगती गोलंदाज दिग्विजय देशमुखने धोकादायक मनदीपसह आणखी दोन बळी मिळवून महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. १त्रिपाठीचे हे या हंगामातील पहिलेच अर्धशतक ठरले. यापूर्वीच्या पाच सामन्यांत त्याने अनुक्रमे ०, १३, २८, ८, २५ अशा धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : २० षटकांत ४ बाद २०१ (अझिम काझी नाबाद ७१, राहुल त्रिपाठी नाबाद ६३; सिद्धार्थ कौल २/३१) विजयी वि. पंजाब : मनदीप सिंग ६७, अनमोलप्रीत सिंग ३६; दिग्विजय देशमुख ३/३४)
’ गुण : महाराष्ट्र ४, पंजाब ०