मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : रोमहर्षक लढतीत मुंबई पराभूत

कर्णधार मनीष पांडे (८४) आणि करुण नायर (७२) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १४९ धावांची भागीदारी रचून कर्नाटकला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.

कर्नाटकची नऊ धावांनी सरशी; रहाणेचे अर्धशतक व्यर्थ

कर्णधार अजिंक्य रहाणेने (५४ चेंडूंत ७५ धावा) दमदार अर्धशतक झळकावूनही अन्य फलंदाजांच्या हाराकिरीमुळे सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघावर कर्नाटकविरुद्ध नऊ धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली.

एलिट ‘ब’ गटातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना  कर्नाटकने ४ बाद १६६ धावा केल्या. वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने (२/३२) मयांक अगरवाल (०) आणि देवदत्त पडिक्कल (५) यांना पहिल्या तीन षटकांतच बाद केले. परंतु कर्णधार मनीष पांडे (८४) आणि करुण नायर (७२) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १४९ धावांची भागीदारी रचून कर्नाटकला दीडशे धावांचा टप्पा गाठून दिला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (४), यशस्वी जैस्वाल (१३) या मुंबईच्या नामांकित फलंदाजांनी निराशा केली. परंतु रहाणेने सिद्धेश लाडसह (३२) तिसऱ्या गड्यासाठी ८१ धावांची भर घालून मुंबईला सावरले. रहाणेने सहा चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली.

कृष्णप्पा गौतमने लाडला, तर केसी कॅरिअप्पाने रहाणेला लागोपाठच्या षटकात बाद केले. शिवम दुबेसुद्धा (३) स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे १५ षटकांत २ बाद १२५ धावांवरून मुंबईची ५ बाद १२९ अशी तारांबळ उडाली. अखेरच्या षटकांत २४ धावांची हव्या असताना प्रसिद्ध कृष्णाने आदित्य तरे (नाबाद १२) आणि अथर्व अंकोलेकर (नाबाद १३) या दोघांना फक्त १५ धावाच करू दिल्या. त्यामुळे मुंबईला ६ बाद १५७ धावांवरच समाधान मानावे लागले. शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत मुंबईसमोर सेनादलचे आव्हान असेल.

मुश्ताक अली स्पर्धेच्या सलग दुसऱ्या हंगामात मुंबईला सलामीचा सामना गमवावा लागला. गतवर्षी दिल्लीने मुंबईला ७६ धावांनी धूळ चारली होती.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक : २० षटकांत ४ बाद १६६ (मनीष पांडे ८४, करुण नायर ७२; मोहित अवस्थी २/३२) विजयी वि. मुंबई : २० षटकांत ६ बाद १५७ (अजिंक्य रहाणे ७५, सिद्धेश लाड ३२; केसी कॅरिअप्पा ३/२६)

’  गुण : कर्नाटक ४, मुंबई ०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mushtaq ali cricket tournament mumbai lost in a thrilling match akp

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या