रणजी स्पर्धेतील उपांत्य फेरीत झालेला पराभव महाराष्ट्राची पाठ सोडत नाही़  सय्यद मुश्ताक अली पश्चिम विभागीय ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही महाराष्ट्राला सौराष्ट्राने नऊ विकेट्स राखून पराभूत केले.
गहुंजे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राला पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला होता़  सौराष्ट्रविरुद्ध धमेंद्रसिंह जडेजा याच्या प्रभावी गोलंदाजीसमोर महाराष्ट्र संघाला २० षटकांत ९ बाद १०८ धावांवर समाधान मानावे लागल़े  त्यानंतर चेतेश्वर पुजारा याने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर सौराष्ट्राने १६.५ षटकांत केवळ एक विकेटच्या मोबदल्यात विजय मिळविला.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धर्मेद्रसिंह जडेजा (३/१४), जयदेव उनाडकट (२/१०) व सिद्धार्थ त्रिवेदी (२/३०) यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे महाराष्ट्राच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. महाराष्ट्राकडून निखिल नाईक (२९) व स्वप्निल गुगळे (२५) हे दोनच फलंदाज थोडीफार चमक दाखवू शकले.
सौराष्ट्राने शेल्डॉन जॅक्सन (२०) याची विकेट लवकर गमावली मात्र त्यानंतर पुजारा याने ५१ चेंडूंत नाबाद ५४ धावा करताना सागर जोगियानी (नाबाद ३५) याच्या साथीत ८२ धावांची अखंडित भागीदारी केली. त्यामुळेच त्यांना एकतर्फी विजय मिळविता आला.
संक्षिप्त धावफलक :
महाराष्ट्र : २० षटकांत ९ बाद १०८ (स्वप्निल गुगळे २५, निखिल नाईक २९, धर्मेद्रसिंह जडेजा ३/१४, जयदेव उनाडकट २/१०, सिद्धार्थ त्रिवेदी २/३०) पराभूत वि.
सौराष्ट्र :  १६.५ षटकांत १ बाद १११ (शेल्डॉन जॅक्सन २०, चेतेश्वर पुजारा नाबाद ५४, सागर जोगियानी नाबाद ३५).